Rahul Gandhi News: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) आहे. मंगळवारी (24 जानेवारी 2023) राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्ट्राईक वक्तव्यावरही (Digvijay Singh Surgical Strike) राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा भारतीय सैन्यावर (Indian Army) विश्वास असून दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात पुरावे मागितल्यानं राजकीय वादळ निर्माण झालं होतं. दिग्विजय यांच्या वक्तव्याशी काँग्रेस किंवा माझा काहीही संबंध नाही, असे राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं.  हे दिग्विजय सिंह यांचं वैयक्तिक मत असू शकतं, असंही यावेळी ते म्हणाले. 


आम्हाला भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास : राहुल गांधी 


राहुल गांधी म्हणाले की, "दिग्विजय सिंह जे काही बोलले, त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही, ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. आमचा आमच्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे, लष्करानं काही केलं तर त्यांना पुरावे देण्याची गरज नाही. त्यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. ती पक्षाची भूमिका नाही."


राजनाथ सिंह यांचा पक्ष देशात द्वेष पसरवतोय : राहुल गांधी 


एका प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी म्हणाले की, मला जम्मूच्या लोकांच्या वेदना समजल्यात. मला जम्मूच्या लोकांकडूनही खूप काही शिकायलाही मिळालं. राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी म्हणाले की, देशभरात सुरू असलेली आणि देशाला जोडणारी पदयात्रा देशाच्या हिताला कशी हानी पोहोचवत आहे, हे मला समजत नाही. राजनाथ सिंह यांचा पक्ष देशात द्वेष पसरवत असून त्यामुळे देशाचं नुकसान होत आहे. 


राजनाथ सिंहांच्या वक्तव्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप धर्म, जात आणि लिंगाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडतंय. देशात द्वेष पसरवत आहे. भारताच्या बंधुत्वाबद्दल, भारताच्या संस्कृतीबद्दल देशात काय चाललंय? राजनाथ सिंह एका पक्षाचा भाग आहेत, ते त्यांच्या पक्षाची भाषा बोलतायत. ते स्वतःचा दृष्टिकोन मांडत नाहीत. 


द्वेष कमी करायचाय : राहुल गांधी


भारत जोडो यात्रेबाबत राहुल गांधी म्हणाले की, या यात्रेचं उद्दिष्ट देशाला जोडणं, द्वेष कमी करणं, भाजप द्वेषाच्या विरोधात उभं राहणं हा आहे. केंद्र सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, महागाई आणि बेरोजगारी सातत्यानं वाढत असून भाजप सरकार  अपयशी ठरलं आहे.


हजारो प्रेमाची दुकाने उघडायची आहेत : राहुल गांधी 


काश्मीरमधील लोकांच्या मनातील वेदना ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं राहुल म्हणाले. आम्ही प्रत्येकावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो. जम्मू-काश्मीर कठीण काळातून जात आहे, हे समजून घ्या. भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण केलेली दरी भरून काढण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये प्रेमाची हजारो दुकानं उघडायची आहेत. द्वेषानं काहीही होत नाही, हिंसेनं कोणतेही प्रश्न सुटत नाही. एक मिठी काम करू शकते. तुम्हाला तुमचे हक्क लवकरात लवकर मिळावेत, अशी आमची इच्छा आहे.


पप्पू म्हणून हिनवण्यासंदर्भात काय म्हणाले राहुल गांधी? 


माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपनं हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. पद्धतशीरपणे माझी प्रतिमा खराब केली. पैशानं काहीही करता येतं, हे भाजपच्या मनात आहे. आरएसएस आणि भाजपच्या नेत्यांना असं वाटतं की, सत्ता आणि पैशानं काहीही केलं जाऊ शकतं. कोणाचीही प्रतिमा बदनाम करा, कोणतंही सरकार विकत घ्या, जे काही करायचं ते पैशाने करता येतं. पण सत्य शक्ती आणि पैशाच्या पलीकडे आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, पैसा आणि गर्व व्यर्थ आहे.