नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित केलं. बिहारमध्ये सुरु असलेल्या स्पेशल इंटेन्सिव रिव्हिजन चा उद्देश मतदार यादीतील त्रुटी दूर करणं हा आहे. मात्र, त्या संदर्भात भ्रम फैलावण्यात येत आहे आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवत राजकारण काही लोक करत आहेत, असं ज्ञानेश कुमार गुप्ता म्हणाले होते. याला काँग्रेस नेते पवन खेरा यांनी उत्तर दिलं आहे. पवन खेरा म्हणाले की आम्ही कोणत्या मतदाराच्या खांद्यावर बंदुक ठेवत राजकारण करत नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या नाजूक खांद्यावर बंदूक ठेवत लोकशाहीची हत्या करत आहेत.
पवन खेरा म्हणाले की मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत जे म्हटलं ते ऐकून असं वाटलं की भाजपची स्क्रिप्ट होती. राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती, त्यात विविध मुद्दे ठेवले होते, तथ्य मांडलं होतं, सहा महिन्यांच्या परिश्रमानंतर निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माहिती ठेवली होती. निवडणूक आयोगानं महादेवपुरा विधान सभा निवडणुकीबाबत काहीच म्हटलं नाही, असंही पवन खेरा म्हणाले.
पवन खेरा म्हणाले की पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार गुप्ता म्हणाले की एका व्यक्तीचं नाव अनेक ठिकाणी नोंदवलं असेल तर काय झालं, तो व्यक्ती एकदाच मतदान करु शकतो, आमचा थेट प्रश्न आहे की गुप्ताजी हा युक्तिवाद न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्यास तयार आहेत का?
निवडणूक आयोगानं काही लोकांना मृत जाहीर केलं होतं, त्यांच्यासोबत राहुल गांधी यांनी चहा घेतला, असं पवन खेरा म्हणाले. मात्र, निवडणूक आयोगाला लाज वाटली नाही. ते म्हणतात सीसीटीव्ही फुटेज जर दिलं तर गोपनीयतेचा भंग होईल मग ते रेकॉर्ड कशासाठी केलं जातं. पवन खेरा पुढं निवडणूक आयुक्तांबाबत म्हणाले की तुमचं वय सध्या भाजपचे एजंट होण्याचं नाही. तुम्ही कितीही निवडणुकीची चोरी करा मात्र लवकरच नवं सरकार येईल, असंही खेरा यांनी म्हटलं.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी देखील निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मते बिहारमध्ये मृत मतदारांची संख्या 22 लाख असून गेल्या 6 महिन्यात नव्हे कित्येक वर्षात मेलेले आहेत. मात्र, त्याचं रेकॉर्ड नोंदवण्यात आलं नाही. महुआ मोईत्रा पुढं म्हणाल्या की जर असं असेल तर निष्पक्ष निवडणुकीत बाधा आणली म्हणून गेल्या काही वर्षांमधील निवडणूक आयोगाचे सर्व कर्मचारी, मुख्य निवडणूक आयुक्त सर्वांना तुरुंगात पाठवलं पाहिजे.