Edible Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने पुन्हा एकदा खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारकडून खाद्य तेल (Edible Oil) उत्पादक कंपन्या आणि मार्केटिंग कंपन्यांना किंमती कमी करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे. खाद्य तेल प्रोसेसर आणि उत्पादकांनी जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं. या कंपन्यांनी खाद्य तेलाच्या किमती 10 ते 12 रुपयांनी कमी करण्याचं मान्य केलं आहे. 


रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर तेलाच्या किंमती भडकल्या आणि फटका बसला तो सर्वसामान्यांच्या खिशाला. तेलाच्या किंमती अव्वाच्या सव्वा वधारल्याने खायचं काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशातच महागाईने देखील टोक दाखवलं आणि अडचण झाली ती तळहातावर पोट असणाऱ्यांची. मात्र मागील काही दिवसात तेलाच्या किंमतींत सातत्याची घट बघायला मिळत आहे. त्यामुळे मागील महिन्यात तेल उत्पादक कंपन्यांनी देखील किंमती 15 ते 20 रुपयांनी घटवल्या होत्या.


खाद्य तेल आयात करणारा भारत हा प्रमुख देश 
भारत हा खाद्य तेलाची आयात करणारा प्रमुख देश आहे. कारण भारत आपल्या एकूण खाद्य तेलाच्या जवळपास दोन तृतीयांश तेल आयात करतो. सूर्यफुलाचे तेल निर्यात करणाऱ्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक असलेल्या युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे तेलाच्या किंमती भडकल्या. तिकडे इंडोनेशियाकडून पाम तेलावर आणलेल्या निर्यातबंदीमुळे पामतेलाच्या किंमतीही गगनाला भिडल्या. उत्पादनात घट झाल्याने इतर तेलांचीही तीच परिस्थिती होती. मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने किंमतींवर परिणाम बघायला मिळाले. 


लवकरच तेलाचे दर प्रतिलिटर 10 ते 12 रुपयांनी कमी होणार?
तेल कंपन्यांची केंद्र सरकारसोबत बैठक पार पडली. यात खाद्य सचिवांनी तेल उत्पादक आणि मार्केटिंग कंपन्यांना किंमतीकमी करण्यासंदर्भात सूचना केली. अशात, आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव बघता खाद्यतेलाच्या किंमती येत्या एक ते दोन दिवसात 10 ते 12  रुपये प्रति लिटरने पुन्हा कमी होण्याचा अंदाज आहे.


येणारे दिवस हे सणासुदीचे असणार आहेत. दुसरीकडे, वाढलेल्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी खाद्य तेलाच्या किंमती कमी केल्यास सरकारला फायदा होणार आहे. 


VIDEO : खाद्य तेलाचे दर कमी होणार