मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे की, माझ्या प्रिय देशवासियांनो, माझ्यात कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. कोरोनाची चाचणी घेतल्यानंतर माझा अहवाल सकारात्मक(पॉझिटिव्ह) आला आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी अहवान करतो की त्यांनी आपली कोविड-19 चाचणी करुन घ्यावी. शिवाय माझ्यासोबत संपर्क आलेल्या निकटवर्तीयांनी विलगीकरणात राहावे, असं चौहान ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मी सर्व गाईडलाईन्सचं पालन करत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला क्वारंटाईन करणार आहे. माझं राज्यातील जनतेला आवाहन आहे की, आपण काळजी घ्या. थोडासा हलगर्जीपणामुळे आपल्याला कोरोना होऊ शकतो. मी कोरोनापासून वाचण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र अनेक लोकं मला वेगवेगळ्या कारणांसाठी भेटत होती, असं त्यांनी म्हटलंय.
त्यांनी पुढं म्हटलं आहे की, कोविड-19 वर लवकरात लवकर उपचार झाल्यास व्यक्ती पूर्णपणे बरा होतो. मी 25 मार्चपासून दररोज कोरोना संक्रमण स्थितीची पुनरावलोकन बैठक घेत आलो आहे. मी यापुढे व्हिडीओ परिषदेद्वारे कोरोनाचे पुनरावलोकन करण्याचा प्रयत्न करीन असंही ते म्हणाले.
माझ्या अनुपस्थितीत ही बैठक आता गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा, नागरी विकास आणि प्रशासन मंत्री भूप्रेंद्र सिंह, आरोग्य शिक्षा मंत्री विश्वास सारंग आणि आरोग्य मंत्री डॉ. पी.आर. चौधरी घेतील. मी स्वत:ही उपचारादरम्यान कोविड-१९ वरील नियंत्रणासाठी शक्य ते प्रयत्न करीन, अशी माहिती चौहान यांनी दिली आहे.