पणजी: मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपने राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या शोधमोहीमेचा वेग वाढवला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी उशिरा पणजीमध्ये आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्या नावावर चर्चा झाली, परंतु एकमत झालं नाही. त्यातच काँग्रेसनेही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सिस डिसुजा यांच्या निधनानंतर तसंच दोन आमदारांच्या निधनानंतर राज्याच्या 40 सदस्यीय विधानसभेतील संख्याबळ 36 झालं आहे. एक नजर गोवा विधानसभा जागांच्या गणितावर...


भाजप - 12
महाराष्ट्र गोमंतक पार्टी - 3
गोवा फॉरवर्ड पार्टी - 3
अपक्ष - 3
काँग्रेस - 14
राष्ट्रवादी काँग्रेस - 1
एकूण - 36

बहुमताचा आकडा - 19

चार जागा रिकाम्या
गोवा विधानसभेची सदस्य संख्या 40 आहे. मनोहर पर्रिकर यांच्याशिवाय आमदार फ्रान्सिस डिसुझा यांचं निधन तसंच मागील वर्षी काँग्रेसचे सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे या दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर चार जागा रिकाम्या झाल्या आहेत. अशाप्रकारे सध्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्या 36 झाली आहे. परिणामी सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 19 वर आला आहे. तर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपचं संख्याबळ 12 झालं आहे.

नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमत नाही
राज्यात सत्ताधारी भाजपच्या 12, महाराष्ट्र गोमांतक पक्षाच्या 3, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या 3 आणि अपक्ष 3 अशा एकूण 21 जागा आहेत. मात्र पर्रिकर यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट असलेल्या सहयोगी पक्षांमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावरुन मतभेद आहेत. राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यासाठी घेतलेल्या बैठकीत एकमत झालेलं नाही. या राजकीय सत्तासंघर्षात काँग्रेसही सक्रिय झाली आहे. काँग्रेसने राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं चर्चेत
मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून दोन नावं सुचवण्यात आली आहेत. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे ही ती दोन नावं आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या (एमजीपी) सुदीन धावलीकर यांनाही मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. प्रमोद सावंत सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. तर विश्वजीत राणे मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री आहेत. काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये सहभागी झाले होते.

मनोहर पर्रिकरांचं निधन
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (17) रात्री स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झालं. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशाने प्रामाणिक, मनमिळावू आणि सर्वार्थाने मोठा नेता गमावल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे आज दिल्लीसह इतर सर्व राज्यातील राजधानीमध्ये तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तर गोव्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीन गडकरी गोव्यात दाखल

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर, मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5 वाजता होणार अंत्यंसस्कार

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा मनोहर पर्रिकरांनी सुचवलं

'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय

लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय  

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली