कोलकाता: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित 'पराक्रम दिवस' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे त्या नाराज झाल्या आणि त्यांनी भाषण देण्यास नकार दिला.


केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने कोलकात्यात या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाषणाला उभ्या राहताच व्यासपीठाच्या खाली बसलेल्या काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावर ममता बॅनर्जी नाराज झाल्या. त्या म्हणाल्या की, "हा सरकारचा कार्यक्रम आहे, कोणत्या राजकीय पक्षाचा नाही. त्यामुळे कोणाला बोलावून अपमानित करणे ठीक नाही."


ममता बॅनर्जीं म्हणाल्या की, "मला वाटते की सरकारने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची एक प्रतिष्ठा राखण्याची आवश्यकता आहे. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. इथे कोणाला बोलावून त्याचा अपमान करणे हे शोभत नाही. विरोधाच्या रुपात मी काहीच बोलणार नाही." मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.





असं सांगण्यात येतंय की ममता बॅनर्जी भाषणाला उभ्या राहिल्या तेव्हा व्यासपीठाच्या खालून 'जय श्री राम' अशा घोषणा सुरु झाल्या होत्या.