Continues below advertisement

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राजधानी दिल्लीत पोहोचले असून दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra modi), उपराष्ट्रपती सी. राधाकृष्णन यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. मराठवाड्यात गेल्या 8 दिवसांत मुसळधार पाऊस पडला असून अतिवृष्टीने (Rain) शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतातील पिकांसह मातीही वाहून गेल्याचं चित्र विदारक आहे. तर, लेकराप्रमाणं सांभाळलेली जनावरही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात मनुष्यहानीही झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, शेतकऱ्यांवरील या संकटावर आता मदतीची फुंकर घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याच, पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत त्यांच्यासमवेत तब्बल 1 तास चर्चा केली. आपल्या भेटीदरम्यान, कागदपत्रांची मोठा फाईल घेऊन मुख्यमंत्री पंतप्रधानांसमोर बसल्याचंही दिसून आलं. या भेटीत मराठवाड्यासह महाराष्ट्रासह झालेल्या अतिवृष्टीची माहिती देत केंद्र सरकारकडून मदतीची मागणीही केली आहे. या भेटीसंदर्भात स्वत: मुख्यमंत्र्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. मी मुख्यमंत्री म्हणून आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांच्या सहीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलं आहे. तसेच, महाराष्ट्रात अतिवृष्टीने कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे, हेही सांगितलं. त्यानुसार, आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा, जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणीही मी त्यांच्याकडे केली. त्यास, पंतप्रधानांनी सकारात्मकता दाखवली आहे. लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या, आम्ही त्यावर कार्यवाही करू, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Continues below advertisement

कर्जमाफीबाबतही स्पष्टच सांगितलं (Devendra Fadnavis on loan waiver)

राज्यातील नुकसानीसंदर्भात सध्या माहिती घेण्याचं काम सुरू आहे, आढावा सुरू आहे. एकदा हे काम पूर्ण झाल्यानंतरच एकूण किती नुकसान झालंय हे सांगता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. कर्जमाफीसंदर्भात आमची समिती अभ्यास करत आहे, कारण कर्जमाफी ही वारंवार करता येत नाही. आता, खरीप हंगामासाठी घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे. आता, शेतकऱ्यांना तातडीची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा होईल हे महत्त्वाचं आहे. त्यानुसार, आम्ही काम करत आहोत, असेही मुख्यमंत्र्‍यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी दिल्ली दौऱ्यातून दिली.

हेही वाचा

गहू तांदूळ मिळालं पण, 5 हजार नाही; चूल विझलेल्या प्रयागबाईंचा व्यथा, गावच्या शाळेतील महापुरुषही पावसात