CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) वतीने दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीविरोधातील आंदोलनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या आंदोलनात कोर्टात दोष सिद्ध झालेला आणि शिक्षा भोगून आलेला नक्षलवादी अरुण भेलके सहभागी झाल्याचे उघडकीस आले आहे. नक्षल पीडितांसाठी काम करणाऱ्या जन संघर्ष समितीने या गंभीर मुद्द्यावरून आयोजक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनातील अरुण भेलकेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अरुण भेलके लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराविषयी म्हणजेच संसदेविषयी आक्षेपार्ह आणि धमकीवजा विधान करताना दिसत आहे. "आता तरी मोजकेच तरुण दिल्लीतील रस्त्यावर आले आहेत... एके दिवशी लाखो करोडो लोक रस्त्यावर उतरून दिल्लीतील संसद उखडून फेकून देतील," असा इशारा देताना तो दिसून येत आहे. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Who is Arun Bhelke? : कोण आहे अरुण भेलके?
- अरुण भेलके मूळचा चंद्रपूरचा असून सुरुवातीच्या काळात विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून काम करायचा.
- नक्षल चळवळीसोबत संबंध आले आणि त्याने चंद्रपूर आणि गडचिरोलीतील जंगलात नक्षलींसोबत काम केले.
- त्याने कुख्यात नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे सोबत काम केल्याचे ही तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
- नंतर नक्षली थिंक टँककडून त्याला मुंबई - पुणे परिसरात काम करण्यासाठी पाठविले गेले.
- 2014 मध्ये एटीएसने त्याला पुण्यातील कासेवाडीमधून अटक केली.
- त्याच्याकडून एटीएसने नक्षलवाद्यांशी संबंधित हस्तलिखित कागदपत्रे, तसेच नक्षलवादाशी संबंधित मजकूर असलेल्या लॅपटॉप, पेन ड्राईव्ह व इतर इलेक्ट्रॉनिक डिवाइस जप्त केले होते.
- एटीएस कडून अटक झाली तेव्हा अरुण भेलके पुण्यात "आदित्य पाटील" हे खोटे नाव आणि बनावट ओळखीसह पुण्यात राहत होता.
- एटीएसने अरुण भेलके विरोधात "बेकायदा प्रतिबंधक हालचाल कायदा" म्हणजेच UAPA अंतर्गत गुन्हा नोंदविला.
- त्याच गुन्ह्यात एटीएसच्या विशेष न्यायालयाने अरुण भेलकेला 8 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.
- 2023 मध्ये अरुण भेलके शिक्षा भोगून तुरुंगा बाहेर पडला.
- आता तो सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनात लोकशाहीचे सर्वोच्च सदन असलेल्या संसदेबद्दल आक्षेपार्ह विधान करताना दिसून आला.
Abhijeet Dipke: जन संघर्ष समितीचे अभिजीत दिपके यांना सवाल
न्यायालयाने ज्याच्यावर दोष सिद्ध करून शिक्षा सुनावली, असा व्यक्ती विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काय करत होता? संसदेला उखडून फेकण्याची भाषा करणारे लोक दिल्लीत अराजकता माजवण्यासाठी आले होते का? असा संतप्त सवाल जन संघर्ष समितीने विचारला आहे. तसेच, नक्षलवादाशी संबंधित लोक आंदोलनात कसे आले आणि अभिजीत दिपके या घटनेची जबाबदारी घेणार का, अशी विचारणा करत या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे. आता यावर अभिजीत दिपके काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Arun Bhelke: अरुण भेलकेची प्रतिक्रिया
त्यांचा दिल्लीतील आंदोलनात "संसद उखडून फेकून देऊ" अशा वादग्रस्त आणि चिथावणी देणाऱ्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एबीपी माझाने चंद्रपुरात अरुण भेलकेसोबत संपर्क साधला. लोकशाही धोक्यात असून देशात "अलोकशाही वातावरण" निर्माण झाला आहे, "अनागोंदी माजली" आहे, देश "हुकूमशाही" कडे वाटचाल करत आहे, आणि संसद त्याचा प्रतीक आहे. वैयक्तिक आणि संघटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची संघटनात्मक अभिव्यक्ती गळचेपी करण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा सारखे कायदे आणले जात आहे. अशा वातावरणात दिल्लीत होणाऱ्या तरुणांच्या आंदोलनात जावं आणि आवाज उचलावं असे वाटले म्हणून मी दिल्लीतील CJP च्या आंदोलनात गेलो आणि हिंमत करून त्या ठिकाणी संसदेबद्दल बोललो, अशी प्रतिक्रिया अरुण भेलकेने दिली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
