नवी दिल्ली : भ्रष्ट अधिकारी लाच म्हणून रोख रक्कम, भेट वस्तू मागतात. मात्र, एका अधिकाऱ्याने विमान मागितले असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील (Directorate General of Civil Aviation) एअरो स्पोर्ट्सचे संचालक कॅप्टन अनिल गिल (Anil Gill) यांना निलंबित केले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर गिल यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) करणार आहेत. तर, गिल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, अनिल गिल यांच्यावर लाच म्हणून विमान घेतल्याचा आरोप आहे. फ्लाइंग ट्रेनिंग स्कूलमधून तीन विमाने लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या लाचेच्या बदल्यात त्यांनी ऑडिटदरम्यान फ्लाइंग ट्रेनिंग संस्थेच्या त्रुटींकडे दुर्लक्ष केले, तसेच त्यांच्या सुरक्षेतील त्रुटींकडेही दुर्लक्ष केले. अनिल गिल लाचखोरी प्रकरणात सध्या चर्चेत आहे.
कोण आहे अनिल गिल?
अनिल गिल यांनी DGCA मध्ये एअरो स्पोर्ट्सचे संचालकपद भूषवले आहे. डीजीसीएपूर्वी, ते डीजीसीएच्या फ्लाइंग आणि ट्रेनिंग विभागाचे संचालक होते. लिंक्डइनवरील त्यांच्या प्रोफाइलनुसार, त्यांचे बालपण हरियाणामध्ये गेले. त्यांवी 10वी पर्यंतचे शिक्षण करनाल येथील सेंट तेरेसा कॉव्हेंट स्कूल या शाळेतून केले. त्यानंतर दयाल सिंग पब्लिक स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. 2009 मध्ये त्यांनी डून व्हॅली इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून बॅचलर पदवी मिळवली. वर्ष 2013 मध्ये त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. 2009 ते 2015 पर्यंत ते हरियाणा सरकारमध्ये पायलट इन्स्ट्रक्टर होते. सन 2015 मध्ये त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालकामध्ये उपसंचालक फ्लाइंग ट्रेनिंग म्हणून पदभार स्वीकारला.
लाच म्हणून घेतलेले विमान
अनिल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 25 ऑक्टोबर रोजी विमान वाहतूक अधिकाऱ्यांना एक निनावी पत्र प्राप्त झाले, ज्यामध्ये एका जागल्याने (Whistleblower) अनिल गिलवर गंभीर आरोप केले होते. FTO कडून विमान लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अनिल यांनी एफटीओकडून तीन प्रशिक्षण विमाने घेतल्याचा आरोप आहे. त्यांनी ती विमाने इतर ट्रेनिंग स्कूल्सला 90 लाख रुपयांना भाडेतत्त्वावर दिली होती. या पत्रानंतर डीजीसीएने या प्रकरणाच्या चौकशीसाठी दक्षता समिती स्थापन केली. तपासाअंती त्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील एअरो स्पोर्ट्स संचालनालयाचे संचालक कॅप्टन अनिल गिल यांच्या पदावरून हटवण्यात आले.
गिल यांनी आरोप फेटाळले
अनिल गिल यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. हे पहिले प्रकरण नसले तरी याआधी 2021 मध्येही त्याच्यावर लाच म्हणून विमान घेतल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी अनिल गिल हे डीजीसीएचे मुख्य दक्षता अधिकारी होते.