Chirag Paswan : बिहारमधील भाजपच्या मित्राची मोठी घोषणा, चिराग पासवान यांचा पक्ष विधानसभेच्या सर्व 243 जागा लढवणार, रालोआत नवा पेच
Chirag Paswan : रालोआचा घटक पक्ष असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षानं बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

पाटणा : केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी बिहार राज्याच्या हितासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचं म्हटलं. विरोधकांकडून आपल्या मार्गात अडथळा आणला जातोय, असं चिराग पासवान म्हणाले. चिराग पासवान यांनी छपराच्या राजेंद्र स्टेडियममध्ये नव संकल्प महासभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी त्यांचा राजकीय पक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) बिहार विधानसभेच्या 243 जागा लढवेल. चिराग पासवान यांचा राजकीय पक्ष सध्या केंद्रात एनडीएत आहे, त्यामुळं बिहारमध्ये भाजप आणि जदयूपुढं नवा पेच निर्माण झाला आहे.
चिराग पासवान पुढं म्हणाले की लोक विचारतात चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवेल का? याचं उत्तर सारणच्या पवित्र भूमीतून देत आहे, हो मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ही विधानसभा निवडणूक एक एक बिहारी आणि प्रत्येक बिहारी कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. यापुढं चिराग पासवान म्हणाले की जर चिराग पासवान निवडणूक लढवणार असेल तर 243 जागांवर लढेल. सर्व जागांवर चिराग पासवान म्हणून निवडणूक लढणार आहे.
चिराग पासवान यांनी पाटणामधील उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्येप्रकरणावरुन चिंता व्यक्त केली.जे सुशासनाचा दावा करतात त्यांच्या काळात अशा घटना घडत आहेत. मी देखील त्याच सरकारचं समर्थन करत आहे हा चिंतेचा विषय आहे. मी याप्रश्नावरुन पळ काढण्याचा प्रयत्न करणार नाही, किंवा आमच्या सरकारला देखील यापासून पळ काढता येणार नाही. एवढी मोठी घटना शहरात होत असेल तर चिंता वाढवणारी आहे, असं चिराग पासवान म्हणाले.
चिराग पासवान यांनी बिहारच्या लोकांसाठी लढणार असल्याचं म्हटलं, आपल्या भावांसाठी, आई बहिंणींसाठी बिहारमध्ये अशी एक व्यवस्था तयार करणार, एक बिहार बनवणार ज्यामुळं आपल्या भागाला विकासाच्या मार्गावर पुढं जाता येईल. चिराग पासवान यांचे नातेवाईक खासदार अरुण भारती यांनी चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणूक लढवायला पाहिजे, कार्यकर्त्यांची ती भावना असल्याचं म्हटलं. चिराग पासवान यांनी सर्वसाधारण जागेवरुन विधानसभा निवडणूक लढवल्यास ते एका वर्गाचे, एका समाजाचे नेते नाहीत तर संपूर्ण बिहारचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात असल्याचं चित्र स्पष्ट होईल, असं अरुण भारती म्हणाले.
चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) एनडीएचे महत्त्वाचे सहकारी आहेत. बिहारमध्ये भाजपसोबत नितीशकुमार यांचा जदयू, जीतन राम मांझी यांचा हम आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा सहभागी आहे.




















