नवी दिल्ली : तुम्ही खात असलेली अंडी तुमच्या आरोग्याला अहितकारक तर नाहीत? हा प्रश्न विचारण्याचं कारण सोशल मीडियावर अंड्यांसंदर्भात काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. चीनमधून रासायनिक अंडी भारतात पाठवली जात असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरली आहे.

रासायनिक अंडी शरीराला घातक आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, चीनमधून रासायनिक अंडी पुरवली जात असून, चीनचा भारतावर एकप्रकारे 'अंडा अटॅक' असल्याचे म्हटले जात आहे.

सरकारने या माहितीचं खंडन केलेले नाही. त्यामुळे एकंदरीत प्रकराणकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत की, अंड्यांसंदर्भातील सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीला अफवा न मानता, बनावट अंड्यांसंदर्भात सतर्क राहावं.



केंद्र सरकारच्या आदेशानंतर छत्तीसगड सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेची सूचना जारी केली आहे. छत्तीसगडमध्ये अद्याप बनावट अंडी सापडली नाहीत. मात्र, संपूर्ण राज्यात अत्यंत बारकाईने तपास सुरु करण्यात आला आहे.

बनावट अंड्यांचं एखादं प्रकरण जरी समोर आलं, तरी कठोर कारवाई केली जाईल, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अंडी विकणाऱ्या दुकानदारांकडून अद्याप बनावट अंड्यांसंदर्भात कोणतीही माहिती किंवा तक्रार आलेली नाही. त्यामुळे सध्यातरी दिलासादायक गोष्ट असली, तरी सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीमुळे सर्व राज्य सतर्कतेच्या भूमिकेत आहेत.

चीनमध्ये जी बनावट अंडी पाठवली जात आहेत, त्यामध्ये घातक रसायन आहे. सोशल मीडियावर रासायनिक अंड्यांसंदर्भातील माहिती खरी असेल, तर शरीराला अशी अंडी घातक आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.