Chennai Airport : तामिळनाडूतील चेन्नई विमानतळावर आज एक धक्कादायक घटना घडली. संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील शारजाह येथून आलेल्या एअर अरेबियाच्या विमानातील एका घटनेने सर्व प्रवाशांना धक्का बसला. विमान चेन्नई विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीवेवर जात असताना, एका पुरुष प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडून बाहेर उडी मारल्याची घटना घडली. या घटनेमुळं काही वेळ सर्वच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
विमान मुख्य धावपट्टी सोडून हळूहळू टॅक्सीवेवर जात असताना घडली घटना
दरम्यान, विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना विमान उतरल्यानंतर लगेचच घडली. जेव्हा विमान मुख्य धावपट्टी सोडून हळूहळू टॅक्सीवेवर जात होते आणि पूर्णपणे थांबले नव्हते त्यावेळी घडली. या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि तात्काळ सुरक्षा कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाला विमानात मळमळ जाणवली होती, त्यामुळं त्याने दोनदा उलट्या केल्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चेन्नई विमानतळ अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल काय सांगितले?
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा देत सांगितले, की विमान हळू जात असताना एका पुरुष प्रवाशाने विमानातून उडी मारली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच विमानाचेही नुकसान झाले नाही. ही घटना मुख्य धावपट्टीवर घडली नाही. विमानतळ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमान प्रवासादरम्यान त्या प्रवाशाची प्रकृती बिघडली होती. त्याला मळमळत होते आणि विमानात त्याने दोनदा उलट्या केल्या. यावरून असे सूचित होते की, त्याच्या ढासळत्या प्रकृतीमुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. दरम्यान, या घटनेमुळं काही वेळ सर्वच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
या घटनेनंतर लगेच कारवाई
घटनेनंतर लगेचच वैमानिकाने जमिनीवरील सुरक्षा दलाला सतर्क केले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले, जिथे पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे विमानतळाच्या कामकाजात थोड्या काळासाठी व्यत्यय आला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य धावपट्टी पहाटे 3.23 ते 4.23 पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. विमानांना दुय्यम धावपट्टीवर वळवण्यात आले होते. प्रवाशाची ओळख अधिकृतपणे निश्चित झाली नसली तरी, तो तामिळनाडूतील पुदुक्कोट्टाई जिल्ह्याचा रहिवासी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.