मुंबई : 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट' (एआयओसीडी) या देशभरातील केमिस्ट्स आणि वितरकांच्या सर्वात मोठ्या कंपनीने 28 सप्टेंबरला बंदची हाक दिली आहे. औषधांची ऑनलाईन विक्री आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्ट्सनी संपाचं हत्यार उपसलं आहे.


केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश किंवा ई-फार्मसीजना भारतात कोणत्याही स्वरुपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्ट्सनी पुढील शुक्रवार म्हणजेच 28 सप्टेंबर 2018 रोजी एक दिवसाचा बंद पुकारला आहे.

औषधांची ऑनलाइन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाच्या तंत्रज्ञानप्रेमी तरुण पिढीचं कधीच भरुन न येणारे नुकसान होऊ शकतं, असं एआयओसीडीने म्हटलं आहे.

केंद्र सरकार, संबंधित मंत्री आणि विभाग, राज्य अन्न व औषध प्रशासन यांना निवेदन पत्रिकांच्या माध्यमातून वारंवार आवाहन केलं होतं आणि ई-फार्मसीज, पोर्टल्स किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीच्या अनेक केसेस दाखवल्या होत्या, असं एआयओसीडीने सांगितलं.

या समस्येच्या गांभीर्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्ट्सनी दोन वेळा एक दिवसीय बंद केला आणि आठ तास काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.  या प्रयत्नांनंतरही ऑनलाईन कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन करत असताना अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याचं दिसत आहे, असाही दावा एआयओसीडीने केला आहे.