Chardham Yatra 2023 : केदारनाथ यात्रा सुरू होताच खराब हवामानामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. पाऊस, खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रेची नोंदणी थांबवण्यात आली आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार 3 मेपर्यंत भाविकांना नोंदणी करता येणार नाही. हवामान स्वच्छ झाल्यानंतरच नोंदणी पुन्हा सुरू होईल. सध्या बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामसाठी नोंदणी सुरू आहे.


 






रुद्रप्रयाग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यांनी सांगितले की, 'केदारनाथमध्ये खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे यात्रेकरूंची नोंदणी म्हणजेच 3 मेपर्यंत थांबवण्यात आली आहे. हवामानाची स्थिती पाहता नोंदणी सुरू करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. वास्तविक पाहता केदारनाथचा मार्ग डोंगराळ आणि दुर्गम आहे, त्यामुळे हवामान खराब असल्यास प्रवास सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते.


खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रा थांबली


बर्फवृष्टी आणि पावसामुळे केदारनाथच्या मार्गावरही परिणाम झाला आहे. अलीकडेच बद्रीनाथ महामार्गावर एका डोंगराचा ढिगारा पडल्याने रस्ता बंद झाला होता. 25 एप्रिल रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून या भागात बर्फवृष्टीही सुरू आहे.


देशातील विविध राज्यांतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हवामान खात्याने 9 भाषांमध्ये अॅडव्हायझरी जारी केली आहे. उत्तराखंडचे हवामान अपडेट मिळाल्यानंतरच प्रवाशांना प्रवास सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी पाहता रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.


 






केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथचे दरवाजे हे सहा महिन्यांसाठी बंद असतात तर सहा महिने ते भक्तांसाठी उघडले जातात. केदारनाथमधील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन हे दरवाजे बंद ठेवले जातात. गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडताच चारधाम यात्रेची सुरुवात होते. गेल्या महिन्यात म्हणजे 25 एप्रिलला केदारनाथ धामचे दरवाजे उघडले गेले आहेत. 


ही बातमी वाचा: