Chandrayaan-3 :  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ (S Somnath) आणि इतर उच्च अधिकाऱ्यांनी गुरुवारी 'चांद्रयान-3' (Chandrayaan-3)  मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या आधी तिरूपती सुल्लुरपेटा येथील श्री चेंगलम्मा परमेश्वरिणी मंदिरात प्रार्थना केली. 'चांद्रयान-3' मोहीम आज (14 जुलै) दुपारी 2.35 वाजता श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाईल. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी देवीकडे प्रार्थना केली. 


देवीच्या दर्शनानंतर सोमनाथ म्हणाले...


देवीच्या दर्शनानंतर सोमनाथ म्हणाले, 'मला चेंगलम्मा देवीच्या आशीर्वादाची गरज आहे. मी या मिशनच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.' तसेच ते पुढे म्हणाले, चांद्रयान-3 उद्यापासून (14 जुलै) आपला प्रवास सुरू करणार आहे. आम्हाला आशा आहे की सर्व काही ठीक होईल. तसेच, ते 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल.' असेही ते म्हणाले. सोमनाथ यांच्या मते, इस्रोचे पुढील प्रक्षेपण वेळापत्रक हे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) द्वारे जुलैच्या अखेरीस व्यावसायिक उपग्रहाचे प्रक्षेपण असेल.


सोशल मीडियावर चर्चेला उधाण 


दरम्यान, (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी देवीच्या घेतलेल्या दर्शनामुळे अर्थातच सोशल मीडियावर (Social Media) अनेकांनी भारताच्या संस्कृतीचे समर्थन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. तर, काहींनी मात्र त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


ट्विटरवर (Twitter) एका यूजरने लिहिले आहे की, “हे खूप छान आहे. ही आपली भारतीय संस्कृती आहे, की कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना करतो आणि देवाचा आशीर्वाद घेतो. इस्रोच्या टीमला शुभेच्छा. हा आपल्या देशासाठी एक अभिमानाचा क्षण आहे.” 


तर, दुसऱ्या यूजरने "त्यांना देवाच्या आशीर्वादाची गरज आहे का? ते शास्त्रज्ञ नाहीत का? असे लोक समाजात पंथ रुजवतात.” असं म्हणत प्रतिवाद सुरु केला. तर, तिसऱ्या यूजरने “मला वाटलं इस्रोचा विज्ञानावर विश्वास आहे!” अशा शब्दांत ट्विट केले.


इतरांनी अजूनही शास्त्रज्ञांना रॉकेटला "लिंबू-मिर्ची" ने सुशोभित करण्यासाठी किंवा यान स्वतःच चंद्राच्या मार्गावर मंदिरात भेट देईल. अशा शब्दांत कमेंट्स करून प्रतिवाद सुरु केला आहे. दरम्यान, अशा संमिश्र स्वरूपाच्या कमेंट्स यूजर्सने सोशल मीडियावर करून प्रतिवाद सुरु केल्याचं पाहायला मिळालं.  


चांद्रयान -3 ची मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे देश चंद्रावर जाण्यास यशस्वी ठरले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Chandrayaan 3 Mission: एका ऐतिहासिक उड्डाणासाठी इस्रो सज्ज, श्रीहरीकोटामध्ये सुरु झालं सर्वात महत्त्वाचं काऊंटडाऊन