Chandrayaan 3 Journey : इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेला सुरुवात झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं यशस्वीरित्या प्रक्षेपण पार पडलं आहे. चांद्रयान-3 मोहिमेचा मुख्य उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून तेथील माहिती गोळा करणं ही आहे. या मोहिमेत भारत यशस्वी झाल्यास चंद्राच्या या भागात उतरणार भारत हा पहिला देश ठरणार आहे. आता चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रतीक्षा आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार, याबाबत इस्रोच्या प्रमुखांनी माहिती दिली आहे. चांद्रयान-3 यशस्वी प्रक्षेपणानंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. 


चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार?


चांद्रयान-3 मोहिमेद्वारे भारताची चंद्रावर उतरण्याची योजना आहे. चांद्रयान-3 यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार पहिला देश ठरेल. चंद्राचा दक्षिण ध्रुव अधिक काळ अंधारात असतो. या भागात पाण्याची साठे शोधण्याचाही या मोहिमेमागचा एक हेतू आहे. 14 जुलैला चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण झालं. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं की, "जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल." 






इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी शुक्रवारी माहिती दिली की, चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणानंतर बूस्टर आणि पेलोड रॉकेटपासून वेगळे करण्यात झालं. यानंतर LVM 3-M4 रॉकेटने चांद्रयान-3 योग्य कक्षेत पोहोचवलं. चांद्रयान-3 ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.


'मिशन मून'बाबत इस्रो प्रमुख काय म्हणाले?


चांद्रयान-2 नंतर चार वर्षांनी चांद्रयान-3 चं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इस्रोचे प्रमुखांनी सांगितलं की, "आम्ही पहिल्या वर्षी कोणत्या चुका केल्या होत्या हे पाहिलं आणि नंतर दुसर्‍या वर्षी प्रक्षेपण अधिक चांगलं होण्यासाठी काय सुधारलं पाहिजे, याचा विचार केला. चाचणीदरम्यान काही चुका आढळल्या. तिसऱ्या वर्षी आम्ही सर्व चाचणी केली आणि शेवटच्या वर्षी आम्ही अंतिम असेंब्ली आणि तयारी केली. या कार्यासाठी मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो."


पृथ्वीपासून चंद्राच्या कक्षेपर्यंतचा 40 दिवसांचा प्रवास


क्रायोजेनिक इंजिन चांद्रयान-3 पृथ्वीच्या बाह्य कक्षेत पोहोचलं आहे. हळूहळू चांद्रयान कक्षा आणि वेग वाढवत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केलं जाईल आणि त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. चांद्रयानमधील लँडरचं नाव 'विक्रम' आणि रोव्हरचं नाव 'प्रज्ञान' आहे. 


विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. चांद्रयान-2 च्या लँडरचा  चंद्राच्या पृष्ठभागापासून 2 किमी आधी संपर्क तुटला होता. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Chandrayaan-3 : 'बाहुबली रॉकेट'द्वारे चांद्रयान-3 चं प्रक्षेपण! 130 हत्तींचं बळ... कसं आहे LVM-3 जाणून घ्या...