Chandrayaan 3 Scheduled for Mid-July : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) या चांद्रयानाच्या प्रक्षेपणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण जुलै महिन्याच्या मध्यात होईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे (ISRO) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं आहे. इस्रो बुधवारी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं की, "सध्या, चांद्रयान-3 अंतराळयान पूर्णपणे तयार आहे आहे. त्याची चाचणी पूर्ण झाली आहे. ते 12 ते 19 जुलै दरम्यान प्रक्षेपित करण्यात येईल. संबंधित सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर प्रक्षेपिणाची अचूक तारीख जाहीर करू." अशी माहिती इस्रोच्या अध्यक्षांनी दिली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) हे भारताच्या महत्त्वकांक्षी असणाऱ्या चंद्र मोहिमेतील तिसरे अंतराळयान आहे.


चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात


इस्रोचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, 'सध्या चांद्रयान-3 अंतराळ यान एकत्र जोडण्यात आलं आहे. आम्ही चाचणी पूर्ण केली आहे. आम्ही आता रॉकेट तयार करत आहोत.' एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, 'चांद्रयान-3 रॉकेटमध्ये बसवले जाईल आणि त्यानंतर प्रक्षेपित केलं जाईल. 12 ते 19 जुलै दरम्यान चांद्रयान-3 ला प्रक्षेपित केले जाऊ शकते, परंतु लवकरच याची तारीख निश्चित केली जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.'






चांद्रयानचं प्रक्षेपण कधी होणार?


इस्त्रो प्रमुख सोमनाथ यांनी सांगितलं की, जर काही तांत्रिक अडचण नसेल तर ते 12, 13 किंवा 14 तारखेला चांद्रयान-3 प्रक्षेपित केलं जाऊ शकतं. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आम्हाला नेमकी तारीख सांगितली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


श्रीहरिकोटा येथून होणार प्रक्षेपण


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केलं जाईल. प्रॉपेलंट मॉड्यूल 'लँडर' आणि 'रोव्हर'ला चंद्राभोवती 100 किमीच्या कक्षेत नेईल. यामध्ये चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या ध्रुवीय मोजमापांचा अभ्यास करण्यासाठी 'स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री' पेलोड देखील जोडण्यात आला आहे.