Chandigarh University MMS Case: पंजाबमधील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. शिमला जिल्हा पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पंजाब पोलिस लवकरच अटक करू शकतात. हिमाचल प्रदेशचे डीजीपी संजय कुंडू यांनी ट्वीट केले की, आम्ही चंदीगड विद्यापीठातील कथित आक्षेपार्ह व्हिडीओ लीक प्रकरणातील आरोपीला पकडले आहे. पंजाब पोलिसांच्या विनंतीवरून हिमाचल प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


याबाबत माहिती देताना डीएसपी रुपिंदरदीप कौर यांनी सांगितले की, काल रात्री या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली होती आणि सुत्रांच्या आधारे आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. आम्ही नंतर याप्रकरणी अधिक माहिती जाहीर करू.


काय आहे प्रकरण?


चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर एमएमएस बनवणाऱ्या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांनी या तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपी तरुणी अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवत होती आणि तिच्या ओळखीच्या तरुणाला पाठवत होती, असा आरोप आहे. या तरुणाने हे व्हिडीओ इंटरनेटवर टाकले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झाले. जेव्हा तरुणींनी त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी चौकशीचे आदेश दिले आहेत.


पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक गुरप्रीत देव, काल रात्रीच्या आंदोलनानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी इतर वरिष्ठ अधिकार्‍यांसह चंदीगड विद्यापीठाच्या परिसरात पोहोचले आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याने तरुणांसोबत स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केल्याचे दिसते. अन्य कोणत्याही विद्यार्थ्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ मिळाला नाही.


यातच अशी बातमी समोर आली होती की, या प्रकरणानंतर अनेक विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे खोटे आणि निराधार असल्याचे विद्यापीठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक शील सोनी यांनी पत्रकारांना सांगितले की, अनेक विद्यार्थिनींचे व्हिडीओ लीक झाल्याच्या अफवा पसरल्यानंतर मध्यरात्रीनंतर विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. त्यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या  विद्यार्थिनीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आला असून विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. या प्रकरणात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 354 सी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.