चंदीगड : चंदीगड महापौर निवडणुकीत (Chandigarh Mayor Polls) मतपत्रिकेत खाडाखोड करून पद आणि प्रतिष्ठा पार धुळीस मिळवलेल्या निवडणूक अधिकारी अनिल मसिहविरोधात खटला चालवला पाहिजे, अशा शब्दात फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने उद्या मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत मतपत्रिका आणि मतमोजणीचा व्हिडिओ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मतपत्रिकेत खाडाखोड केल्याबद्दल खटला चालवला गेला पाहिजे, असे म्हणत न्यायालयाने फटकारले आहे. 


चंदीगड विधानसभेत घडलेल्या घोडे-व्यापारामुळे आम्हाला दुःख


"चंदीगड विधानसभेत घडलेल्या घोडे-व्यापारामुळे आम्हाला दुःख झाले आहे," असेही  खंडपीठाने म्हटले आहे. "हा घोडे बाजाराच धंदा बंद झाला पाहिजे आणि त्यामुळेच उद्याच आम्हाला मतपत्रिका पहायच्या आहेत," असेही म्हटले आहे. 30 जानेवारी रोजी झालेल्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने सर्व तीन पदे कायम ठेवली आणि काँग्रेस-आप युतीचा पराभव केला. निवडणूक प्रक्रियेत रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांच्यावर “फसवणूक आणि बनावटगिरी” केल्याचा आरोप करत आपने सुप्रीम कोर्टात नव्याने मतदानाची मागणी केली. 


म्हणजे तुम्ही खाडाखोड केली आहे, खटला चालवावा लागेल


सुप्रीम कोर्टाने अनिल मसिह यांना सुनावणीदरम्यान खंडपीठासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. सोमवारी खंडपीठाने त्यांना व्हिडिओबद्दल विचारणा केली. यावर, मसीह यांनी सर्व मतपत्रिका विस्कळीत झाल्या होत्या त्या सुरळीत करत होतो, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खंडपीठाने त्याला विचारले की त्याने मतपत्रिकांवर खाडाखोड का केली? अनिल मसिह म्हणाले की मतपत्रिका मिसळू नये म्हणून आपण असे केले. म्हणजे तुम्ही खाडाखोड केली आहे, त्याच्यावर खटला चालवावा लागेल. लोकशाही निवडणूक प्रक्रियेत याला परवानगी दिली जाऊ शकत नाही," अशा शब्दात खंडपीठाने फटकारले. 


निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसिह हे सीसीटीव्हीकडे पाहत मतपत्रिकेवर खाडाखोड करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उपायुक्तांना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या नवीन रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती करण्यास सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या