Chandigarh Mayor Election News : लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची लिटमस चाचणी म्हणून समजल्या जाणाऱ्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या उमेदवाराने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. भाजप उमेदवार मनोज सोनकर यांना 16 मते मिळाली. या  निवडणुकीनंतर आप-काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी  इंडिया आघाडीची मते जाणीवपूर्वक अवैध ठरवले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आप-काँग्रेस उमेदवार कुलदीप कुमार यांना 12 मते मिळाली. त्यांना 20 मते मिळणे अपेक्षित होते. 


चंदीगड महापालिकेचे राजकीय समीकरण काय?


चंदीगड महापालिकेत भाजपचे 14 नगरसेवक आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. यानंतर 13 नगरसेवकांसह चंदीगड महापालिकेत 'आप' हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. काँग्रेसचे 7 तर शिरोमणी अकाली दलाचे एक नगरसेवक आहेत. चंदीगड महापौर निवडणुकीत स्थानिक खासदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. भाजपच्या किरण खेर या येथील खासदार आहेत, त्यांनी मतदान केले आहे.


आप-भाजपमध्ये कोणाला किती मते मिळाली?


चंदीगड महापालिकेत विजय मिळवण्यासाठी 19 मतांचा आकडा गाठणे आवश्यक होते. भाजपकडे त्यांचे नगरसेवक आणि खासदारांसह एकूण 15 मते होती. स्वतंत्र शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव नगरसेवकाचे मतही जोडले तर भाजपचे मताधिक्य अवघे 16 वर पोहोचले होते. भाजपच्या उमेदवाराला तेवढीच मते मिळाली आहेत.


दुसरीकडे, आम आदमी पार्टीच्या 13 आणि काँग्रेसच्या 7 अशा मतांची संख्या 20 होती. मतदानानंतर मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा काँग्रेस आणि आपच्या समान उमेदवाराच्या बाजूने पडलेल्या 20 मतांपैकी 8 फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर दोन्ही पक्षांचे उमेदवार कुलदीप कुमार यांना केवळ 12 वैध मते शिल्लक राहिली. त्या आधारे भाजपचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला.


केजरीवालांचा भाजपवर निशाणा 


दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. केजरीवाल यांनी ही निवडणूक विश्वासघात असल्याचे म्हटले आहे. एका महापौर निवडणुकीत भाजप एवढ्या खालच्या पातळीवर घसरू शकते तर देशाच्या निवडणुकीत काय करतील, अशी चिंता केजरीवाल यांनी व्यक्त केली.






 


दरम्यान, चंदीगड महापौरपदाची निवडणूक याआधी पुढे ढकलण्यात आली होती. निवडणूक अधिकाऱ्याने प्रकृती अस्वास्थामुळे निवडणूक घेण्यास सक्षम नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आक्षेप उपस्थित झाल्यानंतर अखेर आज निवडणूक पार पडली. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.