Chandan Mitra Passes Away : राज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार डॉ. चंदन मित्रा यांचं काल रात्री दिल्लीत निधन झालं. त्यांचा मुलगा कुशान मित्रानं यासंदर्भात माहिती दिली. मित्रा यांनी द पायोनियरचे संपादक म्हणूनही काम पाहिलं आहे. चंदन मित्रा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत पोहोचले होते. परंतु, 2018 मध्ये त्यांनी भाजपची साथ सोडत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. डॉ. चंदन मित्रा यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. 


माध्यमांसोबतच त्यांनी राजकीय जगातही आपली ओळख निर्माण केली : पंतप्रधान मोदी 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, "डॉ. चंदन मित्रा यांची ओळख ही कुशाग्र बुद्धी आणि दूरदृष्टी असणारी व्यक्ती अशी होती. त्यांनी माध्यमांसोबतच राजकीय विश्वातही आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्यानं दुःख झालं. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना संवेदना."



राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांनी दु:ख व्यक्त केलं


भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यानी चंदन मित्रा यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "1972 मध्ये शालेय सहली दरम्यान मी चंदन मित्रा यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत आहे. तू जिथेही असशील आनंदी राहा माझ्या मित्रा" आणखी एक ट्वीट करत त्यांनी लिहिलं की, "मी आज सकाळी माझा सर्वात जवळचा मित्र, द पायोनियरचे संपादक आणि माझी खासदार डॉ. चंदन मित्राला गमावलं. आम्ही शाळेपासूनच एकत्र होतो. आम्ही एकत्रच सेंट स्टीफंस आणि ऑक्सफोर्डमध्ये गेलो. आम्ही एकाचवेळी पत्रकारितेत सामील झालो आणि अयोध्या आणि भगव्या लाटेचा उत्सव अनुभवला."



दरम्यान, डॉ. चंदन मित्रा पायोनियर वृत्तपत्राचे संपादक होते. 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेत ते खासदार होते. त्यांची 2010 मध्येही राज्यसभेसाठी निवड झाली होती. वर्ष 2018 मध्ये त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. चंदन मित्रा लेखकही होते.