नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधनसभा निवडणुका संपल्यावरच अर्थसंकल्प सादर करण्याबाबत केंद्र सरकारने विचार करायला हवा, अशी सूचना माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त एस. वाय कुरेशी यांनी दिली आहे. शिवाय, निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडून राज्यांना पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याऐवजी लेखानुदान सादर करण्यास सांगितलं जातं, असेही कुरेशी म्हणाले.

एस. वाय. कुरेशी पुढे म्हणाले की, "सरकार देशातील एका मोठ्या वर्गाच्या भावनांचा निश्चितपणे विचार करेल. केंद्रीय अर्थसंकल्प निवडणुकीनंतरच सादर करणं आवश्यक आहे. कारण एका मोठ्या वर्गाला वाटतं की, अर्थसंकल्पाचा निवडणुकीत निकालावर प्रभाव पडू शकतो."

दरम्यान, 'सायकल' चिन्हावरुन सध्या समाजवादी पक्षातील दोन गटात वाद सुरु आहेत. यावर बोलताना एस. वाय. कुरेशी म्हणाले, "निवडणूक आयोग या वादाला रोखू शकतं आणि दोन्ही पक्षांना अंतरिम नावासह अंतरिम चिन्ह देण्याचे आदेश देऊ शकतं."