नवी दिल्ली : केंद्र सरकारनं पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केलं. चुकीच्या पद्धतीनं दिव्यांग आणि ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेत पूजा खेडकर (Puja Khedkar) यांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2023 च्या बॅचमध्ये स्थान मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. एकीकडे दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु असताना दुसरीकडे केंद्र सराकरनं त्यांना बडतर्फ केलं. 


आतापर्यंत काय घडलं?


पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात 3 जूनला रुजू झाल्या होत्या. पूजा खेडकर यांच्या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली होती.  दरम्यानच्या काळात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्या संदर्भातील एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता.   


केंद्र सरकारच्या डीओपीटी विभागानं 6 सप्टेंबरला भारतीय प्रशासकीय सेवा (प्रशिक्षणार्थी) नियम 1954  च्या कलम 12 नुसार पूजा खेडकर यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.  नियम 12 नुसार केंद्र सरकारला प्रोबेशनवर असलेल्या आयएएसना सेवेतून बडतर्फ करण्याचा अधिकार आहे. 


पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राबाबतचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर यूपीएससीनं त्यांच्यावर कारवाई केली होती. त्याशिवाय केंद्र सरकारनं एक सदस्यीय समिती देखील स्थापन केली होती. पूजा खेडकर यांनी आयएएससाठी पात्र असल्याचे केलेले दावे याची पडताळणी करुन आणि महाराष्ट्र सरकारच्या समितीनं डीओपीटी सचिवांना 24 जुलै रोजी सादर केलेला अहवाल याच्या आधारे पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून बडचर्फ करण्यात आलं.


यूपीएससीनं पूजा खेडकर यांना 18 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्या कारणे दाखवा नोटीसनंतर 31 जुलै रोजी यूपीएससीनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली होती. तर, पूजा खेडकर यांना त्यांची माजू मांडण्यासाठी 30 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. 


पूजा खेडकर 2022 च्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. तर, त्यांना आयएएसच्या 2023च्या बॅचमध्ये त्यांना संधी मिळाली होती.   


पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे 30 तक्रारी 


पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 30 वेगवेगळया अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या जवळपास ३० तक्रारी यूपीएससीकडे आल्या आहेत. यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणे कार्मिक विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी यूपीएससीने पाठवल्या आहेत.


इतर बातम्या : 


Puja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारची मोठी कारवाई