Cash and diamonds stolen from Deputy Commissioner residence : उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोख रक्कम आणि डायमंड चोरीला गेल्याची घटना उघडकीस येताच प्रशासनात खळबळ उडाली आहे. महिला कर्मचाऱ्यावर चोरीचा संशय आहे. चौकशी केली असता त्याने चोरीचा माल तलावात लपवून ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पोलीसांनी चोरीचा माल शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, बोकारोचे उपायुक्त जाधव विजया नारायण राव यांच्या शासकीय निवासस्थानातून रोख 95 हजार रुपये, हिऱ्याने जडवलेली सोन्याची अंगठी, नेकलेस आणि डायमंड कानातले सेट चोरीला गेले आहेत. याशिवाय अनेक कपडे आणि इतर वैयक्तिक वस्तूही गायब असल्याचे आढळून आले. याप्रकरणी महिला होमगार्ड सोनी कुमारी यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. झारखंडमधील बोकारोत ही खळबळजनक घटना समोर आली आहे. 


सर्व नियुक्त महिला कर्मचाऱ्यांची चौकशी 


सोनी कुमारी यांच्या म्हणण्यानुसार, महिला गृहरक्षक मंजू कुमारी आणि गोमा कुमारी यांच्यासह महिला कंत्राटी कर्मचारी पारो देवी आणि अंबिका कुमारी उपायुक्तांच्या निवासस्थानात काम करत आहेत. त्यांना उपायुक्तांच्या दालनात ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला. 20 फेब्रुवारी रोजी डीसीच्या खाजगी खोलीतून रोख रक्कम आणि दागिने गायब झाल्याचे समोर आले, त्यानंतर सर्व नियुक्त महिला कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. यानंतर तपास केला असता 18 फेब्रुवारी रोजी उपायुक्तांच्या अनुपस्थितीत पारो देवीने त्यांच्या खोलीची साफसफाई केल्याचे आढळून आले. साफसफाई करून ती नियोजित वेळेपूर्वी साडे बाराच्या सुमारास आपल्या मुलीची तब्येत ठीक नसल्याचे सांगून निघून गेली.


उपायुक्तांना चोरीची माहिती मिळताच त्यांच्या सूचनेवरून पुन्हा खोलीची झडती घेण्यात आली. यावेळी दागिने आणि रोख रकमेव्यतिरिक्त साड्या, सूट, परफ्यूम आणि इतर वस्तूही गायब झाल्याचं आढळून आलं. सोनी यांनी पारो देवीवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. पारो देवीची कसून चौकशी केली जात असून तिच्या घराचीही झडती घेण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून काही संशयास्पद वस्तू जप्त केल्याचा वृत्त आहे, परंतु अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलीस उपायुक्तांच्या निवासस्थानी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत.


चोरीचा माल तलावात लपवून ठेवल्याचे सांगितले


चोरीचा संशय असलेल्या व्यक्तीने चोरीचा माल तलावात लपवून ठेवल्याचे सांगितले. यानंतर पथकाने तलावाचा शोध घेतला. मात्र, चोरीला गेलेला माल अद्याप मिळालेला नाही. पोलिसांनी लवकरच या प्रकरणाचा छडा लावून चोरीचा माल जप्त करण्याचे आश्वासन दिले आहे. बोकारोचे एसपी मनोज स्वर्गियारी यांनी सांगितले की, बोकारोमधील सेक्टर वन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून काही महत्त्वाचे क्लू मिळाले आहेत. उपायुक्तांच्या निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.


इतर महत्वाच्या बातम्या