Case Filed Against Goa CM Dr. Pramod Sawant: गोव्याचे (Goa News) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांच्याविरोधात पाटणा, बिहार (Bihar) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात परप्रांतीय बिहारी कामगारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे (JDU) नेते मनिष सिंह (Manish Singh) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मनीष सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांनी बिहारमध्ये येऊन आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बिहारींची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 1 मेच्या भाषणात गोव्यातील बहुतांश गुन्हे हे यूपी-बिहारमधील लोक करतात. गोव्यातील 90 टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांमध्ये येथील परप्रांतीय असलेल्या बिहारमधील मजुरांचा सहभाग असतो, असं म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


माझं भाषण कोकणी भाषेत झालं, व्हिडीओ पुन्हा ऐका, समजून घ्या : डॉ. प्रमोद सावंत 


वक्तव्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, " माझ्याविरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल केल्याचं मला सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून कळलं आहे. सत्य हेच आहे की, एक मे रोजी कामगार दिनानिमित्त आम्ही गोव्यात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात माझं भाषण कोकणी भाषेतून झालं होतं. माझ्या भाषणाला काही राजकीय लोकांनी, नेत्यांनी ट्विटस्ट करून मोडून तोडून सांगितलं आहे. मला वाटतंय माझ्या भाषणाचा व्हिडीओ पुन्हा एकदा ऐकावा आणि कोकणी भाषा समजून घ्या. गोव्यात सर्व राज्यातील कामगार आहेत. अशा राज्याबाहेरील कामगारांसाठी गोवा सरकारनं लेबर कार्ड ही योजना आणली आहे. त्या भाषणात तेच मी सांगत होतो. गोव्यात गुन्हा घडता कामा नये. गुन्हा घडल्यास गुन्हेगारांना शोधणं सोपं जावं. यासाठी लेबर कार्ड उपयोगी ठरणार नाही. या विषयीच बोलताना मी परप्रांतीय, स्थलांतरीत कामगारांबाबत वक्तव्य केलं होतं. अशा कामगारांकडून कुठला गुन्हा घडला तर तर त्यांना शोधण्यासाठी कसं लेबर कार्ड गरजेचं आहे, हेच मी माझ्या कोकणी भाषेतील भाषणातून सांगितलं होतं."