ByPoll Elections : देशातील सात राज्यांमध्ये विधानसभेच्या (Vidhansabha) जागांसाठी 5 सप्टेंबर रोजी पोटनिवडणुका (Bypoll Elections) होणार आहेत. तसेच या निवडणुकांचे निकाल 8 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी आणि त्रिपुरामध्ये दोन जागांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पण पुणे आणि चंद्रपूर या लोकसभेच्या (Loksabha) जागांसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचं चित्र सध्या आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील घोसी, उत्तराखंडमधील बागेश्वर, पश्चिम बंगालमधील धुपगुडी, झारखंडमधील डुमरी, केरळमधील पुथुपल्ली, त्रिपुरामधील बॉक्सानगर आणि धनपुर या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
पोटनिवडणूक घेण्याचं कारण काय?
या पोटनिवडणुका घेण्याचं कारण देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. यामधील झारखंड, केरळ, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील आमदारांचं निधन झाल्यामुळे येथील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. तर उत्तर प्रदेशमधील घोसी या मतदारसंघातील आमदार दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिल्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. तसेच त्रिपुरामधील आमदार प्रतिमा भौमिक यांनी देखील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठी त्रिपुरामध्ये पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत.
कसं असणार निवडणुकांचं वेळापत्रक
निवडणुक आयोगाकडून या पोटनिवडणुकांसाठी वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 17 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर उमेदवार 21 ऑगस्टपर्यंत त्यांचा अर्ज मागे घेऊ शकतात. त्यांनंतर 5 सप्टेंबर रोजी या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच 8 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
महाराष्ट्रातील लोकसभा पोटनिवडणुकांचं काय?
महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूर या दोन लोकसभेच्या जागा सध्या रिक्त आहेत. पुण्यातील कसबा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व भाजपचे दिवगंत आमदार गिरीश बापट करत होते. पण त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्तच आहे. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं देखील निधन झालं आहे. बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील चंद्रपूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते. पण त्याच्या निधनानंतर ही देखील जागा अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे या जागांच्या निवडणुकांची प्रतीक्षा अजूनही करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.