Saudi Arabia Bus Accident: सौदी अरेबियात झालेल्या भीषण रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू झाला. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या त्यांच्या बसने डिझेल टँकरला धडक दिली आणि आग लागली. मृतांमध्ये १८ महिला, १७ पुरुष आणि १० मुले यांचा समावेश आहे. या अपघातातून फक्त एकच व्यक्ती वाचली. त्याचे नाव मोहम्मद अब्दुल शोएब (24 वर्ष) असे आहे. शोएब ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता. अपघातानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांपैकी 18 जण एकाच कुटुंबातील होते, ज्यात नऊ मुले आणि नऊ प्रौढांचा समावेश होता. हे कुटुंब हैदराबादचे होते आणि शनिवारी ते भारतात परतणार होते. मृतांपैकी बहुतेक जण हैदराबादचे असल्याचे मानले जात आहे. मदीनापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुहरसजवळ भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) पहाटे 1:30 वाजता हा अपघात झाला. त्यावेळी अनेक प्रवासी झोपले होते आणि त्यांच्या वाचण्याची शक्यता नव्हती.
54 जण हैदराबादहून सौदी अरेबियाला गेले होते
हैदराबाद पोलिसांच्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबर रोजी 54 जण हैदराबादहून सौदी अरेबियाला गेले होते. त्यांना 23 नोव्हेंबर रोजी परतायचे होते. त्यापैकी चार जण रविवारी कारने स्वतंत्रपणे मदीनाला गेले होते, तर इतर चार जण मक्का येथे राहिले होते. अपघात झालेल्या बसमध्ये 46 जण होते. तेलंगणा सरकारने रियाधमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारने मृतांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांना पीडितांची ओळख पटविण्यासाठी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दूतावासाशी जवळून समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.
12 मृतांची ओळख पटली
अपघातात बारा भारतीय बळींची ओळख पटली आहे. त्यात अब्दुल मोहम्मद, मोहम्मद मौलाना, सोहेल मोहम्मद, मस्तान मोहम्मद, परवीन बेगम, झाकिया बेगम, शौकत बेगम, फरहीन बेगम, झहीन बेगम, मोहम्मद मंजूर, मोहम्मद अली आणि गौसिया बेगम यांचा समावेश आहे. जेद्दाहमधील भारतीय दूतावासाने एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. दूतावासाने म्हटले आहे की, "सौदी अरेबियातील मदीनाजवळ भारतीय उमरा यात्रेकरूंशी झालेल्या दुःखद बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासात 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हेल्पलाइन संपर्क तपशील 8002440003 आहे." या घटनेनंतर, तेलंगणा सरकारने सचिवालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे जेणेकरून कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या प्रियजनांच्या ठावठिकाणांबाबत प्रश्न विचारता येतील. कुटुंबे खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात: 79979-59754 आणि 99129-19545.
ओवैसींकडून मृतदेह भारतात आणण्यासाठी आवाहन
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सौदी अरेबियातील भारतीय उमरा यात्रेकरूंशी झालेल्या बस अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. एएनआय या वृत्तसंस्थेशी फोनवरून बोलताना ओवैसी म्हणाले की त्यांनी हैदराबादमधील दोन ट्रॅव्हल एजन्सींशी संपर्क साधला आहे आणि प्रवाशांची माहिती रियाधमधील भारतीय दूतावासाला दिली आहे. त्यांनी रियाधमधील भारतीय दूतावासाचे उपप्रमुख अबू मथन जॉर्ज यांच्याशीही चर्चा केली. जॉर्ज यांनी त्यांना सांगितले की स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा केली जात आहे आणि लवकरच अपडेट दिले जाईल. ओवैसी म्हणाले, "मी केंद्र सरकारला, विशेषतः परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना विनंती करतो की त्यांनी मृतदेह लवकरात लवकर भारतात परत आणावेत आणि जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार द्यावेत."
इतर महत्वाच्या बातम्या