BRICS Summit 2026 नवी दिल्ली : भारतानं 18 व्या ब्रिक्स समिटचं आयोजन केलं असून 12 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबरला नवी दिल्लीत भारत मंडपम येथे ही शिखर परिषद संपन्न होणार आहे. या परिषदेपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यात भारत मंडपममध्ये द्विपक्षीय बैठक सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेत पुतीन यांचं स्वागत केलं.

Continues below advertisement

भारत रशियामध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा 

व्लादीमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यातील द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांचा व्यापार 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणे यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होईल. याशिवाय भारत आणि रशियामध्ये औद्योगिक सहकार्य, रेल्वे प्रकल्प, स्टील, नागरी अणूऊर्जा वापर, क्रिटीकल मिनरल, कुशल मनुष्यबळाचं स्थलांतर, फर्टिलायजर भागीदारी या मुद्यांवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमक्या आणि आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये भारतानं ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये व्यापार आणखी मजबूत करण्यावर भर दिला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ब्रिक्स देशांनी एकमेकांसाठी बाजार खुले करावेत, व्यापारा संदर्भातील नियम सोपे बनवले पाहिजेत, असं म्हटलं. भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीत ब्रिक्स देशांमधील सहकार्य वाढलं पाहिजे, असं म्हटलं.  पीयूष गोयल आणि एस. जयशंकर यांनी रशियाचे मंत्री मॅक्सिम रेशेतनिकोव यांचं स्वागत केलं.   

Continues below advertisement

पीयूष गोयल म्हणाले की ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थेत व्यापाराची भूमिका महत्त्वाची आहे. ब्रिक्स देशांमध्ये जगातील 50 टक्के लोकसंख्या असून जागतिक जीडीपीच्या जवळपास 40 टक्के भागाचं ते प्रतिनिधीत्व करतात. जगाच्या एकूण व्यापारतदेखील ब्रिक्सची भागीदारी 25 टक्के आहेत. भारत ब्रिक्स देशांमधील व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतो. भारताच्या उत्पादन निर्यातीत अभियांत्रिकी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा वाटा आहे. याशिवाय भारताला जगाची फार्मसी देखील म्हटलं जातं. औषधांच्याबाबतीत भारत ब्रिक्स देशांच्या गरजा भागवू शकतो. 

ब्रिक्समध्ये कोणत्या देशांचा समावेश?

ब्रिक्स या नावात ब्राझील, रशिया, भारत,  चीन, दक्षिण आफ्रिका या देशांच्या नावाच्या पहिल्या अक्षरांचा समावेश होतो. याची सुरुवात 2006 मध्ये झाली, मात्र पहिली शिखर परिषद 16 जून 2009 मध्ये पार पडलं. या देशांशिवाय इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे ब्रिक्सचे सदस्य देश आहेत. 

बेलारुस, बोलीव्हिया, कझाकिस्तान, क्यूबा, मलेशिया, नायजेरिया, थायलँड, युगांडा, उझबेकिस्तान, आणि व्हिएतनाम हे भागीदार देश आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन का वाढलं?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षीच्या ब्राझीलमधील ब्रिक्स परिषदेवेळी मोठं वक्तव्य केलं होतं. ब्रिक्स देशांनी डॉलरचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.