अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये एका स्थानिक निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पराभव झाल्याने पक्षालाही धक्का बसला आहे.


मोदींकडून गुजरातच्या बोटाद जिल्ह्यात एका महिन्यापूर्वीच सिंचन योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र याच ठिकाणी एकाच महिन्यात स्थानिक बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. दहा वर्ष या बाजार समितीवर वर्चस्व असणाऱ्या भाजपच्या आठ उमेदवारांना काँग्रेसने पराभूत केलं.

शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. बोटाद जिल्ह्याचे अध्यक्ष डी. एम. पटेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही निवडणूक लढवली. पटेल यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व आठ जागांवर भाजपवर मात केली.

भाजपमधील अंतर्गत मतभेद या पराभवाला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. गेल्या महिन्यात 17 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी सौराष्ट्र नर्मदा आवृत्ती सिंचन योजनेचं उद्घाटन केलं होतं. मोदींच्या या दौऱ्याचा पक्षाला फायदा होईल, असा अंदाज लावला जात होता. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागला, अशी चर्चा आहे.