नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून (BJP) उपराष्ट्रपतीपदासाठीची उमेदवारी कोणाला दिली जाईल, याची चर्चा देशभरात रंगली होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र देत उपराष्ट्रपदीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP nadda) यांनी राधाकृष्णन हे भाजपचे उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यामुळे, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
भाजपनं उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव निश्चित केलं आहे. सीपी राधाकृष्णन यांना एनडीएनं उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील राज्यपाल पदावरुन उपराष्ट्रपती बनले होते. सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. सीपी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल देखील होते, यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून कार्यरत होते. सीपी राधाकृष्णन हे दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते, अशी माहिती भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी दिली. दरम्यान, बिहारमधील हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनीही ट्विट करत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
राधाकृष्णन यांना संधी का?
भाजप पक्षाच्यावतीने आज उच्चस्तरीय नेत्यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. या बैठकीत एनडीएचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा झाली. माध्यमांच्या वृत्तानुसार दिल्लीचे नायब राज्यपाल वीके सक्सेना, बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांची नावं या बैठकीत आघाडीवर होते. याशिवाय गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांची नावं देखील चर्चेत होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा नवं धक्कातंत्र देत महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे नाव एनडीएचे उमेदवार म्हणून जाहीर केले. राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे असून पुढील वर्षी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून राधाकृष्णन यांना संधी देण्यात आल्याचाही राजकीय अंदाज बांधला जात आहे.
उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट
जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. यानंतर निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 21 ऑगस्ट आहे. त्यापूर्वी एनडीएला उमेदवार निश्चित करावा लागेल. उपराष्ट्रपतींच कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारण देत राजीनामा दिला होता. केंद्र सरकारचा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्धचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारण्यावरुन जगदीप धनखड आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद झाले होते.