हरयाणा :  नूह हिंसाचाराचा (Nuh Violence) आरोपी बिट्टू बजरंगीला (Bittu Bajrangi) पोलिसांनी त्याच्या फरीदाबाद येथील घरातून अटक केली आहे. हिंसाचार प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अटक (Bittu Bajrangi Arrested) केली आहे. हरियाणातील नूह येथून हिंसाचार सुरू झाला. त्यानंतर हिंसाचाराची धग ही गुरुग्राम (Gurugram) आणि आसपासच्या जिल्ह्यांनाही बसली. त्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी बिट्टू बजरंगी होता.


बृजमंडल शोभायात्रेपूर्वी बिट्टू बजरंगीने सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रक्षोभक पोस्ट केल्या होत्या. बजरंगीने मुस्लिम समुदायाला चिथावणी देताना म्हटले की होते की, मी सासरवाडीला येत आहे...जावयाचे स्वागत नाही करणार का? फरीदाबास पोलिसांनी त्याला याआधीदेखील अटक केली होती.


विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) यात्रेवर दगडफेक झाल्यानंतर नूहमध्ये दोन गटात हिंसाचार भडकला असल्याचे म्हटले जात आहे. 


बिट्टू बजरंगीने काय म्हटले?


नूहमध्ये हिंसाचार झाला, त्या दिवशी  अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये बिट्टू बजरंगीने म्हटले की, हे सांगू नका की आधीच सांगितले नाही...आम्ही सासरवाडीला आलो..अन् आपली भेट झाली नाही. फुलं, पुष्पहार तयार ठेवा...तुमचे दाजी भेटण्यासाठी येत आहे. 150 गाड्यांचा ताफा आहे. 


या कलमातंर्गत गुन्हा दाखल 


बजरंग दलाच्या बिट्टू बजरंगीला नूह हिंसाचार प्रकरणी अटक केली आहे. बिट्टू बजरंगीविरुद्ध नूह येथील पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एएसपी उषा कुंडू यांच्या तक्रारीवरून बिट्टू बजरंगीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नूह हिंसाचाराच्या प्रकरणात बिट्टू बजरंगीवर भारतीय दंड संहिता, 148, 149, 332, 353, 186, 395, 397, 506, 25, 54, 59 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध नूह सदर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 413 दाखल करण्यात आला होता.


नूहमध्ये हिंसाचाराची सुरुवात...


हरियाणातील नूह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे 31 जुलै रोजी बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची परवानगीही प्रशासनाकडून घेण्यात आली होती. मात्र बृजमंडल यात्रेवर दगडफेक करण्यात आली. काही वेळेतच दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात शेकडो गाड्या पेटवण्यात आल्या. सायबर पोलीस स्टेशनवरही हल्ला झाला. काही ठिकाणी गोळीबारही झाला. नूहनंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली.


इतर महत्त्वाच्या बातम्या: