पाटणा : बिहारच्या (Bihar Politics) राजकारणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यामुळे आता सर्व काही स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचीही घोषणा करण्यात आली असून, ते आज संध्याकाळी शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळाच्या नव्या समीकरणात जेडीयूचे तीन आणि भाजपचे तीन मंत्री असतील. याशिवाय एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या 'हम'लाही स्थान मिळाले असून एकमेव अपक्ष सुमित कुमार सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एकूण नऊ नावांना मान्यता देण्यात आली आहे. या आघाडीत नितीश कुमार मुख्यमंत्री असतील. भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत भाजपकडून डॉ.प्रेम कुमार, विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, जेडीयूकडून विजेंद्र यादव, अपक्ष सुमित कुमार सिंह आणि 'हम'मधून संतोष कुमार सुमन यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

 

नितीश यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (28 जानेवारी) संध्याकाळी पाच वाजता राजभवनात होणार आहे. त्याबाबतची तयारीही सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात असणाऱ्या सर्व नेत्यांना निमंत्रणे पाठवली जात आहेत. नितीश कुमार 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि माजी विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा हेही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

नितीश कुमार यांनी पुन्हा राजकीय भूमिका बदलली


देशाच्या राजकारणात पलटूराम बिरुदावली मानाने मिरवत असलेल्या नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय भूमिका बदलली आहे. 2005 पासून ते बिहारमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. दरम्यान, जीतनराम मांझी 20 मे 2014 ते 20 फेब्रुवारी 2015 या काही महिन्यांसाठी त्यांच्या इच्छेनुसार बिहारचे मुख्यमंत्री बनले. याआधी नितीश कुमार यांनी केंद्र सरकारमधील रेल्वेसह अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. 2000 मध्ये ते पहिल्यांदाच सात दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून 23 वर्षे उलटून गेली आहेत. आतापर्यंत त्यांनी आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी (28 जानेवारी) ते नवव्यांदा शपथ घेऊ शकतात.

 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील मंत्रीपदाच्या कार्यकाळापासून नितीश यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक राजकीय चढउतार आले. या वर्षांत त्यांनी आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मित्रपक्ष बदलत राहिले, पण नितीशकुमार खुर्चीवर कायम राहिले. आता ते नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

वीज मंडळाची नोकरी सोडून राजकारणात 


नितीश कुमार यांनी बिहार अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली आणि विद्यार्थीदशेतच राजकारणात प्रवेश केला. मात्र, सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांना बिहार राज्य विद्युत मंडळात नोकरी मिळाली. काही दिवस काम केल्यानंतर त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. लालू यादव राजकारणात प्रवेश करत होते तोच हा काळ. जनता दलात प्रवेश केल्यानंतर दोघांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

दोनदा निवडणुका हरल्या


वीज मंडळाची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी 1977 मध्ये जनता पक्षाच्या तिकिटावर हरनौत मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर अपक्ष भोलाप्रसाद सिंह या जागेवरून विजयी झाले होते. 1980 मध्ये त्यांनी याच जागेवरून जनता पक्षाच्या (सेक्युलर) तिकिटावर निवडणूक लढवली आणि अपक्ष अरुणकुमार सिंह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. याच जागेवर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी लोकदलाकडून 1985 ची निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या ब्रिज नंदन प्रसाद सिंह यांचा पराभव करून ते आमदार झाले. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला.

 

इतर महत्वाच्या बातम्या