Bihar Hajipur Accident : बिहारच्या (Bihar News) हाजीपूर जिल्ह्यातील देसरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सुलतानपूर गावात रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. एका भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्याकडून या अपघातावर शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, अपघातग्रस्तांना (Accident News) केंद्र सरकार आणि बिहार सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. 


कसा झाला अपघात? 


बिहारची राजधानी पाटणापासून तब्बल 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वैशाली जिल्ह्यात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रस्त्याला लागूनच असलेल्या गावातील काही लोक स्थानिक देवता 'भूमिया बाबा'ची पूजा करण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या पिंपळाच्या बाजूला एकत्र जमले होते. त्याचवेळी भीषण अपघात झाला. भरधाव येणाऱ्या ट्रकनं पूजेसाठी एकत्र जमलेल्या लोकांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आरजेडी आमदार मुकेश रोशन यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.


वैशालीचे पोलीस अधिक्षक मनीष कुमार म्हणाले, "गावकरी लग्नाशी संबंधित प्रथेनुसार मिरवणूक काढण्यासाठी एकत्र जमले होते. जवळच्या सुलतानपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी लग्न होतं. महनर-हाजीपूर महामार्गालगत भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे अपघात झाला." 


पाहा व्हिडीओ : बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकचा कहर, 12 जणांचा मृत्यू



पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार आहे. 


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अपघातातील मृतांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mangaluru Blast Case : रिक्षामधून कुकर बॉम्ब घेऊन जात होता आरोपी, अचानक झाला स्फोट; दहशतवादी कट असल्याची पोलिसांची माहिती