Continues below advertisement

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 6 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष पहिल्यांदा रिंगणात आहे. तेजस्वी यादव यांच्या राघोपूर विधानसभा मतदारसंघात पोहोचले आहेत. प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांना इशारा दिला आहे. राघोपूर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवल्यास राहुल गांधींचं जे अमेठीत झालं होतं तेच तेजस्वी यादव याचं या मतदारसंघात होईल, असं प्रशांत किशोर म्हणाले.

जर मी राघोपूरमधून लढलो तर तेजस्वी यादव यांना राहुल गांधी यांना अमेठीत ज्या स्थितीला सामोरं जावं लागले त्याच स्थितीला सामोरं जावं लागेल, असं प्रशांत किशोर म्हणाले. तेजस्वी यादव यांना राघोपूरच्या लोकांनी मतदान केलं. त्यांच्या पालकांना मुख्यमंत्री केलं, तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री केलं. मात्र, ते लोक सध्या संकटात आहेत, तेजस्वी यादव यांना त्यांची काळजी नाही.

Continues below advertisement

तेजस्वी यादव विधानसभेला दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याचवेळी प्रसांत किशोर देखील तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातून लढणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, त्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

राष्ट्रीय जनता दलाचा राघोपूर हा बालेकिल्ला आहे. तेजस्वी यादव यांनी 2015 आणि 2020 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. या मतदारसंघातून यापूर्वी लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांनी निवडणूक लढवली आहे.

प्रशांत किशोर यांनी राघोपूरला जाण्यापूर्वी म्हटलं की मी राघोपूरला जाऊन लोकांचा प्रतिसाद घेणार आहे. ज्यांना एका कुटुंबाचं वर्चस्व संपवायचं आहे, त्यांना भेटणार आहे. तेजस्वी यादव इथून दोन वेळा आमदार, यापूर्वी लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी येथून निवडून आल्यानंतर देखील मुलभूत सुविधांचा अभवा असल्याचा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.

जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी म्हटलं सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रचार सुरु होणार आहे. किशोर पुढं म्हणाले, आज राघोपूरला जात आहे, जिथून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडले जातात. त्या भागात माझ्या जन सुराजच्या सहकाऱ्यांना भेटायला जात आहे. राघोपूरच्या लोकांना गरिबी, मागासलेपणातून मुक्तता द्यायची असेल तर निवडणूक कोणाला लढायली हवी, असं विचारणार असल्याचं प्रशांत किशोर म्हणाले.