औरंगाबाद: बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये CISF च्या जवानाने आपल्या चार सहकारी जवानांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. सुट्ट्यांसाठी सुरु असलेल्या वादत बलबीर नावाच्या जवानाने हे कृत्य केले आहे.

ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील नबीनगर पॉवर जनरेटिंग कंपनीत घडली. या घटनेनंतर बलबीर या जवानाला तत्काळ अटक केली असल्याची  माहिती पोलीस अधिक्षक डॉ. सत्यप्रकाश यांनी दिली.

बलबीरने सुट्ट्यांसाठी अर्ज दिला होता. मात्र, त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. यावरुन एका जवानाने त्याला खूप सुनावले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने आपल्या रायफलने गोळीबार करण्यास सुरुवात केली, यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलबीरने केलेल्या गोळीबारात बच्चा शर्मा, एन. मिश्र नावाच्या दोन जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अरविंद कुमार आणि जी.एस.राम या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.