अहमदाबाद विमान दुर्घटना ते इंद्रायणी पूल दुर्घटना, 4 दिवसात देशात 4 मोठे अपघात
गेल्या 4 दिवसात देशात 4 मोठे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. या घटनांमुळं देशवासियांवर शोककळा पसरली आहे.

Big Accidents in india : गेल्या 4 दिवसात देशात 4 मोठे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. या घटनांमुळं देशवासियांवर शोककळा पसरली आहे. 12 जूनला गुजगारतमीधल अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून मोठा अपघात झाला होता. यामध्ये 270 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशात इतर ठिकाणी देखील अपघाताच्या घटना घडल्या आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
आज म्हणजेच 15 जून 2025 रोजी केदारनाथजवळ एका हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना घडली. तसेच आजच मथुरा येथे आणखी एक मोठा अपघात झाला, जिथे अनेक लोक घरांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे. त्याच वेळी महाराष्ट्रातील पुण्यात इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
महाराष्ट्रातील पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची (Indrayani River Bridge Collapses) धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 20 ते 25 पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण झखमी झाले आहेत. यामध्ये 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. ही घटना दुपारी 3 वाजून 40 मिनीटांच्या सुमारास घडल्याची माहिती देण्यात आली आहे. कोसळलेल्या पुलाच्या भागात दगड होते. दगडांवर पडलेल्या लोकांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याच वेळी अनेक लोक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघात
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आज (15 जून) सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथून यात्रेकरूंना गुप्तकाशी तळावर परत आणत होते. या हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रौढ व्यक्ती आणि एक बाळ होते. खोऱ्यातील हवामान अचानक बिघडल्यानं हेलिकॉप्टर अपघात झाला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये 2 वर्षाच्या चिमकल्याचा देखील समावेश आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, दोन वर्षांची मुलगी काशी जयस्वाल अशी मृतांची नावं आहेत.
मथुरा येथे मोठी दुर्घटना
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील गोविंद नगर पोलीस स्टेशन परिसरातील माया टीला शाहगंज येथे उत्खननादरम्यान मोठी दुर्घटना घडली. खोदकामावेळी 5 ते 6 घरे कोसळली असून, किमान 12 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने पोहोचले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानचा मोठा अपघात
गुरुवार (12 जून 2025) रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान कोसळले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. या अपघातात आतापर्यंत 270 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विमान अपघातात अडकलेल्यांचाही समावेश आहे. एअर इंडियाचे विमान निवासी भागात कोसळले.
महत्वाच्या बातम्या:
























