Bhagwant Mann Marriage : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी आपली दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. चंदीगडच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री मान यांचा विवाहसोहळा पार पडला. डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्यासोबत मुख्यमंत्री मान यांनी आपली लग्नगाठ बांधली. लग्नसोहळ्यासाठी भगवंत मान यांनी गोल्डन रंगाचा कुर्ता-पायजमा आणि जवाहर कोट परिधान केला होता. तर गुरप्रीत कौर लाल रंगाच्या लेहंग्यात दिसून आल्या. दरम्यान, या खाजगी विवाहसोहळ्यात काही मोजकीच पाहुणेमंडळी उपस्थित होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान, भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे. 


दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ


2015 साल हे भगवंत मान यांच्या आयुष्यात कौटुंबीक कलह वाढवणारं ठरलं. पत्नी इंद्रप्रीत कौर यांनी भगवंत मान यांच्यापासून फारकत घेतली. कोर्टानं निर्णय दिलाय, मला दोन परिवारांमधून एका परिवाराची निवड करायची होती, मी पंजाबलं निवडलं, अशी प्रतिक्रिया घटस्फोटानंतर बोलताना भगवंत मान यांनी दिली होती. भगवंत मान यांचा इंद्रजीत कौर यांच्यासोबत 6 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला.  


भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नी इंद्रजीत कौर आणि मुलं सध्या अमेरिकेत राहतात. 2016 मध्ये दोघांमध्ये घटस्फोट झाल्यानंतर इंद्रजित कौर मुलांसह अमेरिकेत गेल्या आणि तिथेच राहू लागल्या. यापूर्वी मार्चमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं, तेव्हा भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला दोन्ही मुलं उपस्थित होती. 



आई आणि बहिणीच्या आग्रहामुळं पुन्हा विवाह 


मिळालेल्या माहितीनुसार, भगवंत मान यांच्या मातोश्री हरपाल यांची इच्छा होती की, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा त्यांचा संसार थाटावा. आई आणि बहीण यांच्या आग्रहाखातर भगवंत मान लग्नासाठी तयार झाले. भगवंत मान यांच्या मातोश्री आणि बहिण मनप्रीत कौर यांनी स्वतः मुलीची निवड केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान हे राज्यातील संगरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 आणि 2019 मध्ये ते सलग दोन वेळा खासदार झाले. 


यावर्षी मार्चमध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षानं त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करत निवडणूक लढवली होती. राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री झाले. 48 वर्षीय भगवंत मान हे पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री आहेत.