मुंबई : बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडिअमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 50 जण जखमी आहेत. या चेंगराचेंगरीमध्ये सापडलेले सर्व मृत आणि जखमी लोक हे 40 वर्षाच्या आतील आहेत. तसेच मृतांमध्ये तीनजण हे किशोरवयीन होते. तर सहाजणांचे वय हे 20 ते 30 दरम्यानचे होते. ही घटना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (RCB) IPL विजेतेपदाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडली.
बंगळुरूने तब्बल 18 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली आणि त्या संघाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. या टीमच्या सत्कारासाठी चिन्नास्वामी स्टेडिअमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी प्रवेश हा मोफत होता. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यामध्ये विशेषतः तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि पुढे चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 50 जण जखमी झालेत.
Bengaluru Stampede Death List : चेंगराचेंगरीतील मृतांची नावे
या चेंगराचेंगरीत दिव्यांश नावाची 14 वर्षांची मुलगी चिरडली. ती तिच्या आई-वडिलांसह टीमला चिअर अप करायला आली होती. तसेच भूमिका (20), दोरेशा (32), अक्षता (27), सहाना (25), मनोज (33), श्रावण (20), देवी (29), शिवलिंग (17), चिन्मयी (19) आणि प्रज्वल (20) या तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Bengaluru Stampede News : हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल केली
बंगळुरूमध्ये काल झालेल्या चेंगराचेंगरीची कर्नाटक हायकोर्टानं सुमोटो दखल घेतलीये. याचिकेवर आज दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान, चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक 7वर मोफत तिकीटं दिली जाणार आहेत, अशी अफवा पसरल्याचं वृत्त आहे. त्यामुळे शेकडो जण एकाच वेळी गेट क्रमांक 7कडे धावले. तसंच.नेमका त्याच वेळी पाऊस देखील सुरू झाला. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि सरकारने जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा केली.
Chinnaswamy Stadium Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरीत नेमकं काय झालं?
विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान चेंगराचेंगरी: RCB ने पंजाब किंग्जचा पराभव करून पहिला IPL विजेतेपद मिळवले होते. त्यानंतरच्या सेलिब्रेशनदरम्यान स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.
गर्दी नियंत्रणाच्या अपयशामुळे दुर्घटना : स्टेडियमच्या एकाच गेटवर गर्दी एकत्र झाली, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण आला आणि चेंगराचेंगरी घडली.
अफवेमुळे वाढलेली गर्दी: गेट नंबर 7 वर मोफत पास दिले जात असल्याची अफवा पसरली. त्यामुळे लोक त्या गेटवर धावले आणि गर्दी वाढली.
मृतांच्या वयाची माहिती : मृतांमध्ये 3 किशोरवयीन मुलींचा समावेश होता, ज्यांचे वय 13 ते 17 वर्षे होते. एकंदरीत सर्व मृत हे 33 वर्षांच्या आतील होते.