देशातील सर्वाधिक पगार बंगळुरुच्या कर्मचाऱ्यांना, मुंबईचा क्रमांक...
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2018 10:34 AM (IST)
बंगळुरु, मुंबई, दिल्ली (एनसीआर), हैदराबाद आणि चेन्नई या शहरांचा सर्वाधिक पगार देणाऱ्या भारतातील टॉप 5 मध्ये समावेश होतो. मुंबईकरांना सरासरी 9 लाखांचं वार्षिक पॅकेज मिळतं.
मुंबई : पगार... किंबहुना स्वतःपेक्षाही इतरांचा पगार, हा अनेक जणांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. देशभरात सर्वाधिक पगार मिळणाऱ्या शहरांच्या यादीत बंगळुरुने अव्वल स्थान मिळवलं आहे, तर मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो. बंगळुरुतील कर्मचाऱ्यांना सरासरी वार्षिक 12 लाख रुपये पगार मिळतो. 'लिंक्डइन'ने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती उघड झाली आहे. त्यानंतर मुंबई, दिल्ली (एनसीआर), हैदराबाद आणि चेन्नई या शहरांचा क्रमांक टॉप 5 मध्ये लागतो. मुंबईकरांना सरासरी वार्षिक 9 लाखांचं पॅकेज मिळतं. मुंबईइतकेच दिल्लीतील कर्मचारीही नशीबवान आहेत. त्यांना वर्षाला सरासरी 8.99 लाख रुपये पगार मिळतो. चौथ्या क्रमांकावरील हैदराबादचे कर्मचारी 8.45 लाख रुपये कमवतात. चौथ्या आणि पाचव्या स्थानावरील कर्मचाऱ्यांचा पगारात मोठी तफावत आहे. चेन्नईच्या कर्मचाऱ्यांचं सरासरी वार्षिक पॅकेज 6.3 लाख रुपये आहे. हार्डवेअर आणि नेटवर्किंग क्षेत्रातील प्रोफेशनल्सना तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक पगार मिळत असल्याचं हा या सर्वेक्षणात पुढे आलं आहे. कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सीओओ किंवा वरिष्ठ पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना हा पगार मिळतो. तुम्हाला जितक्या वर्षांचा अनुभव आहे, त्याच्या साडेचार ते पाचपट 'लाख' पगार मिळतो. म्हणजेच पाच वर्षांचा अनुभव असेल, तर पाचपट म्हणजेच 25 लाखांचं वार्षिक पॅकेज. दोन वर्षांपूर्वी हे प्रमाण तिप्पट होतं.