Election Officials Appointed to High Ranking Positions in Bengal: पश्चिम बंगालमधील शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नवीन भाजप सरकारने दोन माजी निवडणूक अधिकाऱ्यांची उच्च पदांवर नियुक्ती केली आहे. माजी मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) मनोज कुमार अग्रवाल यांची राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून, तर माजी विशेष निरीक्षक सुब्रत गुप्ता यांची मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात "घडलेले साटेलोटे" (Brazen Collusion) असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
जितकी मोठी चोरी, तितके मोठे बक्षीस
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी म्हटलं आहे की, भाजप-निवडणूक आयोगाच्या चोरांच्या बाजारात, जितकी मोठी चोरी, तितके मोठे बक्षीस. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दावा केला की, निवडणूक आयोगाने भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी 27 लाख लोकांना मतदानापासून वंचित ठेवले. तृणमूल काँग्रेसने (TMC) याला "कलियुगी रामराज्य" म्हटले असून, निवडणूक आयोगाच्या 'न्यूट्रल अंपायर'ने (तटस्थ पंच) भाजपला मदत केल्याचा आरोप केला.
शुभेंदू अधिकारींकडून नियुक्त्यांचे समर्थन
बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी या नियुक्त्यांचे समर्थन केले आहे. अग्रवाल हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नागरी सेवक आहेत आणि सरकार कायद्यानुसार काम करत असल्याचे म्हटलं आहे. सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसचा सल्ला घ्यावा का? अशी विचारणा केली आहे.
दरमयान, एखाद्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला त्याच राज्याचे मुख्य सचिव बनवल्याची घटना दुर्मिळ असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, यापूर्वी मनोहर सिंह गिल यांच्यासारख्या निवडणूक आयुक्तांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करून काँग्रेसकडून मंत्रिपद भूषवल्याची उदाहरणे आहेत.
