Supreme Court On Baba Ramdev: योगगुरू बाबा रामदेव  (Baba Ramdev) यांनी अ‍ॅलोपॅथी (Allopathy) पद्धतीला हानिकारक असल्याचे म्हटल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, "बाबा रामदेव यांना आयुर्वेदाचे चांगुलपण सांगायचे आहे, तर त्यांना तसे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु अ‍ॅलोपॅथी चिकित्सा पद्धतीची संपूर्ण व्यवस्था आणि डॉक्टरांना चुकीचे म्हणणे योग्य नाही.''


आयएमएने दाखल केली होती याचिका 


आयएमएने न्यायालयाला सांगितले होते की, बाबा रामदेव त्यांच्या औषध कंपनी पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांचा प्रचार करताना अॅलोपॅथीबद्दल सतत नकारात्मक गोष्टी बोलतात. याचिकेत म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाबा रामदेव यांनी या आजाराच्या प्रतिबंधासाठी लस अपुरी असल्याचे म्हटले होते. अॅलोपॅथीच्या औषधांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, असा दावाही त्यांनी अनेकदा केला. या औषधांमुळे लोकांची हाडेही कमकुवत होतात, अशी ते म्हणाले होते.


या प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा म्हणाले, "बाबा रामदेव यांचा आपण सर्वजण आदर करतो. कारण त्यांनी योग लोकप्रिय केला. पण सर्व डॉक्टरांना वाईट आणि संपूर्ण औषध पद्धतीला चुकीचे म्हणणे योग्य नाही. ते आयुर्वेदाचा प्रचार करू शकतात. याचे फायदे लोकांना सांगू शकतात. पण ते असा दावा करू शकत नाही की, फक्त त्यांची औषध प्रणाली जगातील सर्व रोग बरे करू शकते."


सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पाठवली नोटीस 


सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. बाबा रामदेव यांना अशा नकारात्मक गोष्टींचा प्रचार करण्यापासून केंद्र सरकार कसे रोखू शकते, हे न्यायालयाला जाणून घ्यायचे आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, बाबा रामदेव यांनी कोरोना काळात डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर टीका केली होती. 2021 मध्ये त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या काही औषधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच ते या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत की, 'कोविड-19 साठी अ‍ॅलोपॅथिक औषधे घेतल्यानंतर लाखो लोक मरण पावले आहेत.' या टीकेला डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र विरोध केला होता. त्याचवेळी दिल्ली मेडिकल असोसिएशनने दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ''तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या अशा लोकांचे स्वागत आहे, मात्र अधिकृत काहीही बोलून कोणाचीही दिशाभूल करू नये.''  


संबंधित बातमी: 


जनतेची दिशाभूल करू नका, अ‍ॅलोपॅथीवरील वक्तव्यावर उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना झापलं