नवी दिल्ली : पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्याही आल्या. मात्र, ज्या घटनेनं ते हाँस्पिटलमध्ये पोहचले ती संशयास्पद असून त्याची सर्वस्तरांतून चौकशी करण्याची मागणी रामदेवबाबांनी केली आहे.


शुक्रवारी जन्माष्टमीच्या दिवशी एक माणूस पतंजलीच्या कार्यालयात आले होत. कार्यालयात दिलेला पेढा खाल्ल्यानंतर बालकृष्ण यांना अचानक त्रास सुरु झाला. त्यांना तातडीनं जवळच्या हाँस्पिटलात हलवण्यात आलं. पण पुढचे पाच तास ते बेशुद्ध होते. नंतर त्यांची रवानगी उत्तराखंडमध्येच असलेल्या हृषिकेशच्या एम्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.

हार्टअटॅक टाळण्यासाठी तुळशी किती प्रभावी आहे, हे आचार्य ट्विटरवर सांगत होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते हाँस्पिटलमध्ये दाखल झाले. सुरुवातीला हार्ट अटॅकच असावा अशी अफवा सोशल मीडियावर पसरली. लोकांना आयुर्वेदाचे उपचार सांगणारे लोक स्वत: मात्र तातडीनं हॉस्पिटलमध्ये कसे दाखल होतात, यावरुनही लोकांनी त्यांच्यावर टीका केली. पण आचार्य बालकृष्ण सध्या ज्या पदावर पोहचलेत, ते बघता यामागे काही घातपात होता का अशी शंका रामदेवबाबांनी उपस्थित केली आहे.

कोण आहेत आचार्य बालकृष्ण?

2006 मध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीआयुर्वेदची स्थापना केली. बाबा योगामध्ये रमले, तर आचार्य बालकृष्ण वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत. आज पतंजलीचं साम्राज्य हजारो कोटींवर पोहचलंय त्याच त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. 2018 मध्ये तर फोर्ब्स मासिकात जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत पतंजलीचे सीईओ म्हणून बालकृष्ण यांचं नाव होतं.