राजस्थानमध्ये खळबळ, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या भावाच्या घरावर EDचा छापा
एबीपी माझा वेब टीम | 22 Jul 2020 03:26 PM (IST)
राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे राजकारण सध्या चर्चेत आहे.
पायलट यांच्या बंडखोरीमुळं सरकार वाचवण्याचं आव्हान असताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या भावाच्या घरावर छापे पडल्याने चर्चेला ऊत आला आहे.
जोधपूरः सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळं एकीकडे राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. तर दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे मोठे भाऊ अग्रसेन गहलोत यांच्या घरी आणि दुकानावर सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने छापे मारले आहेत. कथित खत घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे. खत घोटाळा प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या घराचाही समावेश आहे. अग्रसेन गहलोत हे खत आणि बियाण्यांचा व्यापार करतात. या प्रकरणात घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीकडून जोधपूरमधील अनुपम कृषी कंपनीवर छापा टाकण्यात आला आहे. ही कंपनी अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीची आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे. ईडीकडून राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. कस्टम विभागाने खटला चालवत अनुपम कृषी कंपनीवर सात कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. अग्रसेन गहलोत यांच्यासह माजी खासदार बद्री राम जाखड यांच्या निवासस्थानी देखील ईडीकडून छापा टाकला आहे, असं एएनआयने म्हटलं आहे. काय आहे प्रकरण 2017 साली अशोक गहलोत यांचे भाऊ अग्रसेन गहलोत यांचं नाव खत घोटाळ्यात समोर आलं होतं. त्यांच्यावर आरोप होता की, 2007 ते 2009 दरम्यान शेतकऱ्यांचा हक्क मारुन त्यांनी खाजगी कंपन्यांना फायदा करुन दिला होता. त्यावेळीही अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री होते. अग्रसेन गहलोत यांच्यावर आरोप होता की, त्यांनी आपल्या पदाचा वापर तरत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खतं, बियाणांच्या पुरवठ्यात घोटाळा केला होता. 2017 मध्ये भाजपाने या मुद्द्यावरुन अशोक गहलोत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.