नवी दिल्ली : संसदेत ऑपरेशन सिंदूरवरुन सुरू असलेल्या चर्चेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचं लक्ष्य केलं. पाकव्याप्त काश्मीर घेण्याची संधी असतानाही मोदींनी बिनशर्त युद्धबंदी का जाहीर केली असा सवाल त्यांनी विचारला. मोदींनी इंदिरा गांधींप्रमाणे पाकिस्तानचे तुकडे केले असते तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो असंही ते म्हणाले. मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे भारतासोबत शेजारी देशही उभा राहिला नाही अशा शब्दात अरविंद सावंत यांनी टीका केली.
संसदेचं पावसाळी अधिवशेन सुरू असून त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. लोकसभेत बोलताना अरविंद सावंत यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. आम्ही भारतीय लष्कराचा उदोउदो करु, पण मोदींचा करणार नाही असं सावंत म्हणाले.
Arvind Sawant Lok Sabha Speech : अरविंद सावंत यांचे संसदेतील भाषण खालीलप्रमाणे,
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधानांनी टेलिप्रॉम्टरचा वापर करून बिहारमध्ये इंग्रजीमध्ये भाषण केलं. हे जगाला दाखवण्यासाठी होतं का? तिकडे दहशतवादी मोकाट सुटले असताना यांनी इकडे ढोल बडवायला सुरूवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही पहलगामला गेले नाहीत, मणिपूरला गेले नाहीत. त्यांच्या संवेदना कुठे आहेत?
मोदींच्या धोरणांमुळे भारतासोबत एकही राष्ट्र नाही
मोदींच्या सोबत जगातील एकही राष्ट्र उभं राहिलं नाही हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं दुर्दैव आहे. जो इराण आपल्याला उधारीवर आणि रुपयांच्या बदल्यात तेल देतो त्या देशाशीही संबंध बिघडले. सार्क देशातील एकही शेजारी देश आपल्यासोबत नाही. कॅनडानेही आपल्याला विरोध केला. त्याचवेळी पाकिस्तानसोबत चीन, अमेरिका, तुर्कस्थान आणि इतर देश उभे राहिले. हे कशामुळे झाले?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने युद्धाच्या वेळीच पाकिस्तानला अब्जावधी रुपयांची मदत केली. भारताने यासाठी विरोध केला होता. तरीही पाकिस्तानला पैसे दिले गेले. त्यावरुन भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि यूएनमध्ये काय स्थिती आहे हे दिसून आलं. हे सगळं मोदींमुळे झालं.
पूर्ण राष्ट्र सोबत, तरीही माघार का घेतला?
पाकिस्तानविरोधात पूर्ण राष्ट्र आपल्यासोबत उभे होतं. आम्ही कधीही विरोध केला नाही. त्यानंतर मोदींनी अनेक शिष्टमंडळ इतर राष्ट्रांमध्ये पाठवले. पण त्याचा नेमका काय फायदा झाला? एकाही देशाने उघड उघड भारताला पाठिंबा दिला नाही याचं दुःख वाटतंय.
पाकिस्तान झुकला हे जगाला सांगा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सातत्याने सांगतात की त्यांनी युद्ध रोखले. पण आमच्या पंतप्रधानांनी कधीही सांगितलं नाही की पाकिस्तानने आपल्यासमोर हातपाय जोडले आणि युद्ध थांबवण्याची विनंती केली. पाकिस्तान आपल्यासमोर झुकला हे तुम्ही जगाला सांगायला पाहिजे होतं. पण आपले पंतप्रधान यावर काहीही बोलत नाहीत. पूर्ण राष्ट्र सोबत असताना मोदींनी पाकिस्तानसोबत बिनशर्त युद्धबंदी का जाहीर केली?
पाकव्याप्त काश्मीर जिंकण्याची संधी गमावली
पाकव्याप्त काश्मीर जिंकण्यासाठी आपल्याकडे संधी होती. ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला त्याचप्रमाणे धडा शिकवण्याची संधी आपल्याकडे होती. तुम्ही जर तसं केलं असतं तरी आम्ही मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. पण तुम्ही ती संधी घालवली.
'घुसके मारेंगे' ही भाषा भाजपकडून सातत्याने वापरली जाते. पण ओसामा बिन लादेनला जसं मारलं ते खरं 'घुसके मारेंगे' होतं. ज्या पाकिस्तानने भारताविरोधात दहशतवादी हल्ले केले त्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे बंद करा.