Continues below advertisement

नवी दिल्ली : इंडियन आर्मी म्हणजेच भारतीय सेना दलानं सोशल मीडिया धोरणात बदल केले आहेत. ज्यानुसार सैन्य दलातील जवान आता इन्स्टाग्रामवर खातं उघडू शकणार आहेत. मात्र, एका अटीवर त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे, ती म्हणजेच ते इन्स्टाग्रामवरील कंटेंटवर कमेंट करु शकणार नाहीत किंवा त्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही पोस्ट करु शकणार नाहीत. एएनआय या वृत्तसंस्थेनं संरक्षण दलातील अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. भारतीय सेनादलातील जवान इन्स्टाग्रामचा वापर फक्त पाहण्यासाठी किंवा निरिक्षण करण्यासाठी करु शकतात.

इन्स्टाग्राम वापरता येणार पण अटींसह ...

भारतीय सेना दलातील जवानांनी माहितीच्या डिजीटल युगात जागृत होत संवेदशनशील माहिती संभाव्य किंवा अज्ञात लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखावं हा उद्देश आहे. सोशल मीडिया वापराबद्दलचं धोरण काही दिवसांपूर्वी लागू करण्यात आलं असून ते सर्व रँकच्या अधिकारी आणि जवानांना लागू होतं.

Continues below advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय सेना दलाचे जवान इन्स्टाग्रामवर पोस्ट पाहू शकतात. मात्र, कोणतीही पोस्ट किंवा कमेंट करु शकत नाहीत. याशिवाय कोणत्याही पोस्टला लाईक करता येणार नाही.

इंडियन आर्मीतील जवानांना यूट्यूब, एक्स, क्वोरा आणि इन्स्टाग्रामचा वापर फक्त दर्शक म्हणून करता येईल. जवानांना माहिती आणि ज्ञान मिळावं हा उद्देश आहे. मात्र, त्यांना यूजर जनरेटेड कंटेंट पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी भारतीय सैन्य दलातील जवान एक्सचा वापर करु शकत होते. मात्र, ते इन्स्टाग्रामवर खातं उघडू शकत नव्हते. आता जवानांना खातं उघडता येत असलं तरी ते फक्त दर्शक म्हणून त्याचा वापर करतील. त्यांना दुसऱ्याच्या पोस्ट रिपोस्ट देखील करता येणार नाहीत.

इंडियन आर्मीच्या धोरणातील बदलाचं मुख्य कारणं माहितीचं युग बदलत आहेत. सैन्य दलाला या डिजिटल युगापासून पूर्णपणे दूर ठेवता येऊ शकणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून देश आणि विदेशातील घटनांची माहिती मिळवत जवान अपडे राहतील. मात्र, कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती लीक होणार नाही,याची त्यांना काळजी घ्यावी लागेल.

नोव्हेंबरमध्ये चाणक्य डिफेन्स डायलॉगमध्ये भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्मार्टफोनच्या महत्त्वावर भाष्य केलं होतं. आज काल प्रत्येक जवानाला कुटुंबीयांच्या संपर्कात राहण्याठी आणि ई बुक्स वाचण्यासाठी स्मार्ट फोन आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, स्काईप, व्हाटसअप, टेलीग्राम आणि सिग्नल या सारख्या प्लॅटफॉर्मवर सामान्य स्वरुपाच्या अवर्गीकृत माहितीची देवण घेवाण करता येऊ शकते. मात्र, या माध्यमातून करण्यात येत असलेली चर्चा किंवा संभाषण हे परिचित व्यक्तींपुरतं प्रतिबंधित करण्यात आलं आहे. यासाठी माहिती ज्याला देतोय त्याची ओळख असणं पूर्णपणे त्या यूजरची म्हणजे जवानांची जबाबदार असेल, असं एएनआयनं मार्गदर्शक सूचनांचा हवाला देत म्हटलं आहे. लिंक्डईनचा वापर फक्त रिझ्यूम अपलोड करण्यासाठी करता येईल.