मुंबई: लोकसभा निवडणूक जवळ आली असून त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू झाल्याचं दिसून येतंय. केरळमधील काँग्रेसचे खासदार अँटो अँटोनी (Anto Antony ) यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत (Pulwama Attack) असंच एक वक्तव्य केलं. पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नव्हता असं ते म्हणाले. अँटो अँटोनी यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली असून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. 


पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा फायदा घेऊन 2019 मध्ये भाजपने विजय मिळवला होता असं वक्तव्य काँग्रेस खासदार अँटो अँटोनी यांनी केलं. त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नसल्याचं त्यांनी म्हटलंय. अँटो अँटनी हे केरळमधील पथनमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. 2014 पासून ते या ठिकाणाहून निवडून येत आहेत. 


काय म्हणाले काँग्रेस खासदार अँटो अँटोनी? 


2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा अँटो अँटोनी यांनी बुधवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. केंद्र सरकारवर निशाणा साधत अँटनी यांनी विचारले की, देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानांच्या बलिदानाचा फायदा घेऊन गेल्या निवडणुका जिंकल्या नाहीत का? 


देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा


पुलवामा हल्ल्याबाबत काँग्रेस खासदार अँटो अँटोनी यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. केरळ भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन म्हणाले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका नाकारून काँग्रेस खासदाराने देशाचा अपमान केला आहे. अँटनी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.


 






जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. त्या हल्ल्यात सुमारे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानशी संबंधित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे नाव समोर आले होते. या बदल्यात भारतानेही पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.



ही बातमी वाचा: