Agnipath Protest : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरतील तरूण रस्त्यावर उतरले आहेत. शुक्रवारी देशाच्या विविध भागात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये रेल्वेसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अनेक रेल्वे गाड्यांना आग लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या आंदोलनात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून बिहारमध्ये उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला केला आहे.
या आदोलनामुळे जवळपास 200 ट्रेनच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने 35 गाड्या रद्द केल्या आहेत. उत्तर प्रदेश, तेलंगणा, बिहार, आणि मध्य प्रदेशसह अनेक भागात संतप्त तरुणांच्या जमावाने दगडफेक केली. आंदोलकांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी आणि बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार संजय जयस्वाल यांच्या घरांवर हल्ला केला आहे.
अग्निपथ भरती योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी जयस्वाल यांच्या बेतिया येथील निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. "काही समाजकंटक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे हिंसाचार झाला असून या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 24 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. तर 125 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या सैन्य भरती योजनेबाबत निर्माण झालेले संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. लवकरच अग्निपथ योजनेची अधिसूचना येईल आणि त्याचे वेळापत्रक जारी केले जाईल, असे लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
बिहारमधील दोन, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधील प्रत्येकी एका रेल्वे गाडील आंदोलकांनी आग लागली. संतप्त तरुणांनी बिहारमधील लखीसराय येथे नवी दिल्ली-भागलपूर विक्रमशिला एक्स्प्रेस आणि समस्तीपूर येथे नवी दिल्ली-दरभंगा बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या डब्यांना आग लावली. बक्सर, भागलपूर आणि समस्तीपूरमध्येही आंदोलकांनी महामार्ग रोखून धरले आणि टायर जाळले.