Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं काल (गुरूवारी ता 26) निधन (Dr Manmohan Singh passes Away) झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. तर डॉ. मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच यावेळी त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. काही माणसं जन्माला येतात आणि जातात मात्र, काही माणसं समाज आणि देशाचा विचार करतात. त्यापैकी मनमोहन सिंग होते, असे उद्गार अण्णा हजारे यांनी काढले आहे.
त्याचबरोबर त्यांच्याबाबच्या आठवणी सांगताना अण्णा हजारे म्हणाले, आंदोलनाच्या माध्यमातून डॉ. मनमोहन सिंग यांची आणि माझी अनेक वेळा भेट झाली. नेहमी देशाविषयी आणि समाजाविषयी आस्था असणाऱ्या माणसाचे दुःखद निधन झाल्याने दुःख वाटते आहे, अशा भावना अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केल्या आहे. मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने सच्चा माणूस होते. नेहमी देशाचा विचार करायचे निसर्गाच्या रूढीप्रमाणे माणसं येतात-जातात. मात्र, एक सच्चा माणूस गेल्याने दुःख वाटले अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.
देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. त्यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवरती काम केलं आहे, त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतलेले आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोन वेळाचे देशाचे पंतप्रधान होते. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम देशवासियांच्या स्मरणात आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर भारतात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मनमोहन सिंग यांच्या जाण्याने देशाचं नुकसान- चंद्रशेखर बावनकुळे
आज आपल्या संपूर्ण देशामध्ये देशामध्ये दुःखाची लाट आहे. देशाचे माजी प्रधानमंत्री अर्थतज्ञ मनमोहन सिंगजी आपल्यात नाहीत. भारत सरकारने सात दिवस दुखवटा जाहीर केला आहे. अत्यंत संवेदनशील, शांतपणे आणि सर्वांना सांभाळून आणि आदराच स्थान निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं. मनमोहन सिंग यांची कारकीर्द, त्यांचा राजकीय प्रवास आणि मनमोहन सिंगजी यांच्या ज्या देशाला विकासाकडे नेण्याकरता ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत, त्या पुढच्या काळात पुढच्या पिढीला आमच्या सारख्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो अशी भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.