नवी दिल्ली : अमित शाह यांनी लोकसभेत संविधान 131 वी दुरुस्ती विधेयक, 2026, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक, 2026 आणि सीमांकन विधेयक, 2026 सरकारच्यावतीनं विविध मुद्यांवर सरकारची बाजू मांडली.मी स्पष्टपणे सांगतो परिसीमन आयोगाचा अहवाल तेव्हा लागू होईल, जेव्हा संसद याला स्वीकारेल आणि राष्ट्रपती त्याला मंजूर करतील. हे 2029 पूर्वी होण्याचा प्रश्न नाही, 2029 पर्यंत ज्या निवडणुका होतील त्या जुन्याच जागांप्रमाणं होतील,जुन्याच व्यवस्थेप्रमाण होतील, असं अमित शाह यांनी म्हटलं.
एक मोठं नरेटिव्ह उभं करण्यात येत आहे की जी तीन विधेयकं आहेत, संविधान 131 वी दुरुस्ती विधेयक, 2026, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक, 2026 आणि सीमांकन विधेयक, 2026 हे मंजूर झाल्यास दक्षिणेची लोकसभेतील क्षमता कमी होईल. दक्षिणेतील राज्यांना नुकसान होईल, असं सांगितलं जातंय. मी सभागृहासमोर या विधेयकाचा प्रात्यक्षिक अर्थ लावून काही गोष्टी सांगत आहे.
दक्षिणेतील राज्यांचा जागा किती वाढणार?
कर्नाटक राज्याच्या 543 मध्ये 28 जागा आहेत. कर्नाटकचे खासदार 543 च्या 5.15 टक्के आहेत. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर संविधान दुरुस्ती झाल्यानंतर कर्नाटकची संख्या 28 वरुन 42 होईल. आंध्र प्रदेशच्या जागा 25 आहेत, त्यांची टक्केवारी 4.60 आहे त्यात वाढ होऊन जागा होतील 38 म्हणजेच त्यांची टक्केवारी 850 मध्ये 4.65 टक्के होईल. तेलंगाणात सध्या 17 जागा आहेत, त्यांची सध्याची टक्केवारी 3.13 आहे, आता त्यात 50 टक्के वाढ होऊन जागा होतील 26 म्हणजेच त्यांची टक्केवारी 3.18 टक्के होईल, असं अमित शाह म्हणाले.
तामिळनाडूतून आता 39 खासदार निवडून येतात. 543 जागांमध्ये त्यांची टक्केवारी 7.18 टक्के आहे.50 टक्के जागा वाढल्यानंतर त्यांचे खासदार 59 होतील. 816 च्या सभागृहात त्यांची टक्केवारी 7.23 टक्के होईल.केरळमध्ये 20 खासदार आहेत, त्यांची टक्केवारी 3.68 टक्के आहे. त्यांची खासदार संख्या 30 होईल. केरळची टक्केवारी 3.67 टक्के होईल.
दक्षिण भारताचे सध्याच्या लोकसभेत 543 जागा आहेत त्यात 129 खासदार आहेत, जी टक्केवारी 23.06 टक्के होते. 50 टक्के वाढ झाल्यानंतर 129 वरुन खासदार 195 होतील आणि त्यांची टक्केवारी 23.97 होईल, असं अमित शाह यांनी म्हटलं.
2029 पर्यंतच्या निवडणुका जुन्याच जागांप्रमाणं : अमित शाह
मी स्पष्टपणे सांगतो परिसीमन आयोगाचा अहवाल तेव्हा लागू होईल, जेव्हा संसद याला स्वीकारेल आणि राष्ट्रपती त्याला मंजूर करतील. हे 2029 पूर्वी होण्याचा प्रश्न नाही, 2029 पर्यंत ज्या निवडणुका होतील त्या जुन्याच जागांप्रमाणं होतील,जुन्याच व्यवस्थेप्रमाण होतील, असं अमित शाह यांनी सांगितलं. लोकशाहीत सत्ता नगारिकांच्या मतानं आणि त्यांच्या डोक्यातून मिळते. खासदार म्हणून सांगतो, या देशातून लोकशाही संपण्याची कोणाची ताकद नाही, आणीबाणीत ज्यांनी प्रयत्न केले त्यांना जनतेनं संपवलं असं अमित शाह म्हणाले.
