दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर ‘व्होट चोरी’चे आरोप केल्यानंतर भाजपने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नावाचा संदर्भ देत काँग्रेसवर निवडणुकीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, सोनिया गांधी या 1983 साली भारतीय नागरिक बनल्या, पण 1980 सालच्या मतदारयादीत त्यांचे नाव कसे काय आले असा प्रश्न भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला. अमित मालवीय यांनी या संबंधित पुरावे देत असल्याचा दावा केला आणि काँग्रेसवर निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

भाजपाच्या IT सेल प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या माहितीनुसार, 1980 मध्ये सोनिया गांधी यांचा नाव नवी दिल्लीतील मतदार यादीत समाविष्ट आहे. परंतु त्यावेळी त्या भारतीय नागरिक नव्हत्या, तर इटलीच्या नागरिक होत्या असा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. सोनिया गांधी यांना 1983 साली भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्याचं अमित मालवीय म्हणाले.

Amit Malviya Tweet : काय म्हटलंय अमित मालवीय यांनी?

1980 मध्ये, त्या अजूनही इटालियन नागरिक असताना आणि भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या 3 वर्ष आधीच, त्यांचे नाव नवी दिल्ली मतदार यादीत समाविष्ट झाले. त्या वेळी गांधी कुटुंब 1, सफदरजंग रोड या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारी निवासस्थानी राहत होते. हा स्पष्ट कायद्याचा भंग होता, कारण मतदार नोंदणीसाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

1982 मध्ये विरोधानंतर नाव काढण्यात आले, परंतु १९८३ मध्ये पुन्हा समाविष्ट झाले. त्या वेळीही (१ जानेवारी १९८३ पात्रतेची तारीख असताना) त्यांना भारतीय नागरिकत्व 30 एप्रिल 1983 रोजीच मिळाले होते.

म्हणजेच सोनिया गांधी यांचे नाव एकदा इटालियन नागरिक असताना (1980) आणि नंतर भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या काही महिन्यांपूर्वी (1983), असे दोन वेळा मतदार यादीत आले.

काँग्रेसवर निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसकडे निवडणूक प्रक्रियेत फसवणूक करण्याचा अनुभव असल्याचा चिमटा काढला. काँग्रेसने 1952 मध्ये CPI बरोबर हातमिळवणी करून बाबासाहेब आंबेडकर (B.R. Ambedkar) यांना पराभूत केल्याचा आरोपही त्यांनी केला.